प्रभाकर देशमुखांनी राजकारणात यावे
By Admin | Published: June 12, 2017 02:12 AM2017-06-12T02:12:52+5:302017-06-12T02:12:52+5:30
विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर व माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांची जोडी साताऱ्याच्या दृष्टीने योग्य दिसते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर व माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांची जोडी साताऱ्याच्या दृष्टीने योग्य दिसते. साताऱ्यातील राजकारणासाठी दोघांच्या पाठीशी शक्ती उभी केली तर सातारा पुन्हा एकदा महाराष्ट्रात चमकल्याशिवाय राहणार नाही, असे सूचक वक्तव्य करत देशमुख यांनी राजकारणात यावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी रविवारी केले.
कोकण व पुणे विभागाचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांचा सेवापूर्तीनिमित्त शरद पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात
आला. याप्रसंगी पवार बोलत होते. कार्यक्रमास रामराजे
नाईक-निंबाळकर, पालकमंत्री
गिरीश बापट, पशुसंवर्धनमंत्री
महादेव जानकर, जलसंपदा
राज्यमंत्री विजय शिवतारे,
खासदार छत्रपती संभाजीराजे, माजी मंत्री पतंगराव कदम, दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार जयकुमार गोरे, काँग्रेसचे युवानेते डॉ. विश्वजीत कदम, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ आदी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी ही एका गाडीची दोन चाके असून दोघांमध्ये समन्वय असला पाहिजे. दोन्ही चाके सुरळीत चालली तरच लोकांपर्यंत विकासाची कामे पोहचू शकतील. लोकप्रतिनिधींच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर असते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, असे पवार म्हणाले.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, माणदेशातल्या दुष्काळी भागाच्या वेदना संपविण्यासाठी प्रभाकर देशमुख सेवेत असूनही झटत राहिले. जलयुक्त गावाची संकल्पना यशस्वीपणे राबवीत त्यांनी राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला.