भोंदूगिरीला प्रबोधनकारांनी लाथाच घातल्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 05:58 AM2021-10-17T05:58:04+5:302021-10-18T10:36:19+5:30
प्रबोधन या नियतकालिकातील प्रबोधनकार ठाकरे यांच्या त्रिखंडात्मक लेखसंग्रहाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले
मुंबई : प्रबोधनकार ठाकरे हे नास्तिक नव्हते; पण समाजातील भोंदूगिरीला त्यांनी नेहमीच लाथा घातल्या. कर्मकांडाला त्यांनी नेहमीच विरोध केला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले.
प्रबोधन या नियतकालिकातील प्रबोधनकार ठाकरे यांच्या त्रिखंडात्मक लेखसंग्रहाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, धर्माबद्दल अभिमान असलाच पाहिजे; पण धर्म घरी ठेवा आणि बाहेर राष्ट्र हाच तुमचा धर्म ही शिकवण आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आम्हाला मिळाली.
‘मतांच्या राजकारणाचा विचार न करता बोलले गेले तर अनेक प्रश्न सुटतील, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले. तो धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले की, मत मिळाले नाही तरी चालेल; पण समाजाच्या हिताचे बोलण्याचे धाडस हे केलेच पाहिजे, हिंमत दाखविलीच पाहिजे.
यावेळी राज्यमंत्री विश्वजित कदम, खा. अरविंद सावंत, साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, आ. मंगलप्रभात लोढा, महापौर किशोरी पेडणेकर, विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आदी उपस्थित होते. सुभाष देसाई यांचेही भाषण झाले. या ग्रंथाचे संपादक पत्रकार सचिन परब यांनी प्रास्ताविक केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या वेबसाइटचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
माझा पक्षच पितृपक्ष
पितृपक्षात चांगले काम करू नये, असे म्हणतात. पण माझा तर पक्षच पितृपक्ष आहे, माझ्या वडिलांनी तो स्थापन केलेला आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हणताच हशा पिकला. शेंडी, जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असेही ते म्हणाले.