प्रबोधनकार ठाकरे शाळा राहिली सुरू

By admin | Published: July 12, 2017 03:49 AM2017-07-12T03:49:10+5:302017-07-12T03:49:10+5:30

केडीएमसीच्या प्रबोधनकार ठाकरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील ठोकपगारी शिक्षिकांनी घेतला आणि मंगळवारपासून काम बंद केले

Prabodhankar Thackeray continues to live in school | प्रबोधनकार ठाकरे शाळा राहिली सुरू

प्रबोधनकार ठाकरे शाळा राहिली सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : जोपर्यंत कार्यादेश नाही, तोपर्यंत काम करणार नाही, असा पवित्रा केडीएमसीच्या प्रबोधनकार ठाकरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील ठोकपगारी शिक्षिकांनी घेतला आणि मंगळवारपासून काम बंद केले. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने या शाळेत आपल्या सेवेतील पाच शिक्षकांची नियुक्ती केली आहे. शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर-घोलप आणि प्रभारी अधिकारी जे. जे. तडवी यांनी मंगळवारी दुपारी शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेतली.
केडीएमसीच्या नेतीवली येथील प्रबोधनकार ठाकरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ठोकपगारी कार्यरत असलेल्या शिक्षिकांना नऊ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या शिक्षिकांनी मंगळवारपासून काम थांबविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांच्या या पवित्र्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या पालकांनी सोमवारी महापालिका मुख्यालयावर धडक देत सभापती आणि शिक्षण अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. ठोकपगारी शिक्षिकांनी घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी वाऱ्यावर पडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन या वेळी देण्यात आले होते. शिक्षिकांना गेले काही महिने वेतन मिळालेले नाही ही, वस्तुस्थिती असलीतरी त्या शिक्षिका वेळेवर शाळेत येत नाहीत, व्यवस्थित शिकवित नाहीत, आम्हाला शिक्षक बदलून द्या, अशी मागणी या वेळी पालकांनी केली. त्यावर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल असे, आश्वासन घोलप आणि तडवी यांनी त्यांना दिले होते.
शिक्षिका मंगळवारपासून काम करणार नसतील तर तेथे पालिकेचे शिक्षक नेमले जातील, पण शाळा बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही तडवी यांनी दिली होती. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी ही
शाळा खाजगी संस्थेला चालवण्यासाठी देण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती घोलप यांनी दिली होती.
>... तर आणखी शिक्षक
प्रबोधनकार ठाकरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मंगळवारी महापालिकेने पाच शिक्षक पाठवले. त्यामुळे तात्पुरती का होईना विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळली आहे. गरज भासल्यास आणखी काही शिक्षक तेथे पाठवले जातील, असे तडवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Prabodhankar Thackeray continues to live in school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.