शेतक-यांचा संप वेदनादायी - पंकजा मुंडे
By Admin | Published: June 1, 2017 01:29 PM2017-06-01T13:29:16+5:302017-06-01T13:33:10+5:30
शेतक-यांचा संप वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 1 - शेतक-यांचा संप वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. शेतक-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी काम करुन योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याकडे लक्ष द्यावे लागेल. सरकार या संपाबाबत आत्मपरीक्षण करेल, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्री शेतक-यांबाबत सकारात्मक आहेत, असे सांगत पंकजा पुढेही असे म्हणाल्या की शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याला आधार दिला पाहिजे.
कापसाला हमीभाव दिला. शेतक-यांना व्यापा-याला मध्यस्थी ठेवण्याचे सवय लागली असून ती तोडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, असे सांगत यावेळी पंकजा यांनी सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
""कर्जमाफी दिल्याने शेतकरी आत्महत्या थांबतील याची शाश्वती नाही. कायमस्वरुपी उपाय राबवून शेतकरी स्वावलंबन करायचे असा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी ठेऊन आहे. तुरीच्या बाबतीत शेतक-याला खूप त्रास सहन करावा लागला. शेतकरी केंद्रीत विकास करण्याचा प्रयत्न असून सफल होण्यासाठी वाट पहावी लागेल. सरकारच्या योजना पोहोचाव्यात यासाठी संवाद यात्रा काढली आहे. याआधी खतासाठी या राज्यात गोळीबार झालेत. अशी परिस्थिती आज नाही"", असा दावाही त्यांनी यावेळी केला.
हेलिकॅप्टरमधून शेततळी दिसतील
लोकं म्हणतात की मोदी घोषणा करीत आहेत. याआधी तर घोषणाही होत नव्हत्या. योजना लोकांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी असतात. सत्तेत आल्यावर पहिली दोन वर्ष घोषणांचीच असते. मागेल त्याला शेततळे याचा परिणाम आता दिसू लागला आहे. मराठवाड्यात हेलिकॉप्टरमधून फिरताना आता शेततळे दिसतील, असे विश्वास यावेळी पंकजा यांनी व्यक्त केला.
टीका सहन करण्यासाठी संयम हवा
आमदार अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांशी बोलताना केलेली वक्तव्ये तसेच राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकारांबाबत केलेले विधान हे अहंकाराचे लक्षण आहे काय? असा प्रश्न विचारताच यावर पंकजा म्हणाल्या, ""राजकारण्यांनी अहंकारात राहू नये. अधिकारपदाचा मान राखून संवाद राखावा. परंतु टीका किती सहन करायची, याचीही मर्यादा आहे. अलिकडे राजकारण्यांना डिस्टर्ब करण्याचे प्रमाण वाढलंय"", असेही त्यांनी नमूद केले"".
बीड रेल्वे मार्गासाठी प्रयत्नशील
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ३ जून रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परळीत येणार आहेत. मराठवाड्यासह नगर ते बीड मार्गे परळी या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न असणार आहे. बीडसाठी रेल्वे वाहतूक महत्त्वाची आहे. बीडमध्ये १९ किमी लोहमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेशी संबंधीत उद्योग सुरु व्हावेत. पाणी कमी लागणारे उद्योग यावेत. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून मुलींसाठी नॅपकीनचे उत्पादन बचतगटांकडून करून घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्राम विकासखाते सर्वाधिक योजना राबवित असल्याचा दावा त्यांनी केला.