अकरावीपासूनच करावा लागणार नीट, जेईईचा सराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:55 AM2017-07-19T03:55:24+5:302017-07-19T03:55:24+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांमध्ये केलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांचा नीट, जेईईच्या सरावाला इयत्ता अकरावीपासूनच
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांमध्ये केलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांचा नीट, जेईईच्या सरावाला इयत्ता अकरावीपासूनच सुरुवात होणार आहे. मंडळाने पहिल्यांदाच इयत्ता बारावीसह अकरावीचा आराखडा तयार करताना घटकनिहाय गुण निश्चित केले आहेत. तसेच प्रश्नांची काठीण्यपातळीही बारावीप्रमाणेच ठरविण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत अकरावीला फारसे महत्त्व न देणारे विद्यार्थी व शिक्षकांचाही कस लागणार आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना नीट, जेईई या देशपातळीवरील प्रवेश परीक्षांना सामोरे जाता यावे, यासाठी राज्य मंडळाने इयत्ता अकरावी व बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित व संख्याशास्त्र या चार विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदलला आहे. इयत्ता अकरावीसाठी सुरू शैक्षणिक वर्षापासून तर बारावीसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून
सुधारित आराखडा लागू होणार
आहे. सुधारित आराखड्यामध्ये मंडळाने प्रश्नपत्रिकेची संपूर्ण रचना बदलली आहे.
प्रश्नांची संख्या, त्यांचे गुण, घटकनिहाय प्रश्न, घटकनिहाय गुण, प्रश्नांना दिले जाणारे पर्याय यामध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. हा आराखडा अकरावी व बारावीसाठी सारखाच असणार आहे.
चारही विषयांची काठीण्यपातळी जवळपास सारखीच ठेवण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांचे विषय ज्ञान, त्याची समज, सूत्र व संकल्पनांचा उपयोग करण्याची क्षमता या बाबी तपासल्या जाणार असून त्यासाठी गुण निश्चित करण्यात आले आहेत. यावर्षीपासून अकरावीला हा नवीन आराखडा लागू होणार आहे.
प्रत्येक घटकाचा त्यानुसार विचार करावा लागणार
आतापर्यंत केवळ बारावीसाठीच घटकनिहाय गुण निश्चित केले जात होते. सुधारित आराखड्यामध्ये अकरावीलाही हे गुण निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करताना प्राध्यापकांना प्रत्येक घटकाचा त्यानुसार विचार करावा लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही या घटकांचा अभ्यास करावा लागेल. त्यामुळे यापुढे कोणताही घटक बाजुला ठेवता येणार नाही. तसेच प्रश्नांची काठीण्यपातळीही जेईई व नीटप्रमाणे असेल. यामुळे अकरावीपासूनच विद्यार्थ्यांची नीट व जेईईची तयारी होण्यास सुरुवात होणार आहे.
- पाठ्यपुस्तकातील कोणत्याही घटकांसाठी स्वतंत्र भाग दिला जाणार नाही. मात्र बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू), एका वाक्यात उत्तरे (व्हीएसए), थोडक्यात उत्तरे १ (एसए १) आणि थोडक्यात उत्तरे २ (एसए २) तर सविस्तर उत्तर (एलए) असे प्रश्ननिहाय चार भाग करण्यात आले आहे.
यामध्ये कोणत्याही घटकातील प्रश्न कोणत्याही भागात असू शकतो. प्रत्येक भागासाठी गुणही निश्चित करण्यात आले आहेत. प्रश्नांना दिलेले जाणारे पर्याय कमी करण्यात आले असून एका प्रश्नाला केवळ एकच पर्यायी प्रश्न दिला जाईल.
- आतापर्यंत प्रश्नपत्रिकेचे दोन भाग केले जात होते.
भाग १ मध्ये ठराविक घटकांवरील प्रश्न व भाग २ मध्ये इतर घटकांवरील प्रश्न दिले जात होते. आता ही पद्धत
बंद करण्यात आलेली आहे.
राज्य मंडळाने अकरावी व बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये केलेले बदल सकारात्मक आहेत. नीट व जेईईला सामोरे जाण्यासाठी हा आराखडा योग्य असून त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होईल. विशेषत: अकरावीसाठी प्रत्येक घटकनिहाय निश्चित करण्यात आलेले गुण महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्राध्यापकांना त्यानुसारच प्रश्नपत्रिका काढावी लागेल. पुर्वी अनेकदा काही घटक वगळले जात होते.
- प्रा. किरण खाजेकर, अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालयीन रसायनशास्त्र शिक्षक संघटना