प्रदीप पटवर्धन यांना आवडायचे जळगावचे पायनापल श्रीखंड अन् शेवभाजी, जळगावकरांनी जागवल्या आठवणी
By अमित महाबळ | Published: August 9, 2022 04:48 PM2022-08-09T16:48:10+5:302022-08-09T16:48:49+5:30
Pradeep Patwardhan:
- अमित महाबळ
जळगाव - जुन्या काळातील लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांची एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. प्रदीप पटवर्धन यांचे जळगावमध्ये अनेक नाट्यप्रयोग झाले. त्यांना नेहमीच रसिक प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला; मात्र आणखी एका गोष्टीसाठी ते जळगावच्या प्रेमात पडले होते, ते म्हणजे पायनापल श्रीखंड आणि शेवभाजी.
नवी पेठेतील रहिवासी व सध्या पुण्याला स्थायिक झालेले विजय भांगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना प्रदीप पटवर्धन यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. प्रदीप पटवर्धन यांची ‘मोरुची मावशी’ या नाटकातील भूमिका अतिशय गाजली. या भूमिकेमुळे त्यांचे सर्वत्र नाव झाले. या नाटकाच्या दौऱ्यातला प्रयोग जळगावला बालगंधर्व खुले नाट्यगृहात लावला होता. लोकांनी अक्षरश: रांगा लावून तिकिटे खरेदी केली. त्या दिवशी थिएटर बंद होते. नाटकासाठी झालेली रसिक प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहून पोलीस ठाण्याचे तेव्हाचे प्रभारी अधिकारी गर्गे हे देखील आश्चर्यचकित झाले होते. अर्थातच जळगावमधील हा प्रयोग हाऊसफुल्ल झाला.
काका, श्रीखंड घेऊन या
प्रदीप पटवर्धन यांना जळगावचे पायनापल श्रीखंड आणि शेवभाजी हे दोन्ही पदार्थ मनापासून आवडायचे. त्यामुळे कुठेही भेट झाली म्हणजे काका, तुमच्या जळगावचे श्रीखंड घेऊन या, अशी आठवण ते हमखास काढत. काही वर्षांपूर्वी एका पतसंस्थेच्या नवीन शाखेचा शुभारंभ चोपडा शहरात झाला होता. त्या कार्यक्रमासाठी प्रदीप पटवर्धन आले होते. त्यांनी नाटकातले काही संवाद त्यावेळी म्हणून दाखवले होते.
साडी खरेदी जळगावातून
जळगाव महापालिका शेजारील गल्लीत एक सायकल दुकान होते. त्याच्या बाजूला साडीचे दुकान नवीनच सुरू झाले होते. प्रदीप पटवर्धन या दुकानातून साडी खरेदी करायचे. त्यांनी बँकेतील नोकरी सांभाळून अभिनय केला, अशीही आठवण विजय भांगले यांनी सांगितली.