उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रदीप पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2016 03:22 AM2016-10-26T03:22:50+5:302016-10-26T03:22:50+5:30
जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रदीप प्रेमचंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी
मुंबई : जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रदीप प्रेमचंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी मंगळवारी नियुक्तीची घोषणा केली.
डॉ. पाटील हे सध्या ‘उमवि’च्या पदार्थ विज्ञान विभागाच्या स्कूल आॅफ फिजिकल सायन्सेस येथे प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.
डॉ. सुधीर मेश्राम यांचा कार्यकाळ ७ सप्टेंबर २०१६ मध्ये पूर्ण झाल्यानंतर नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवळे यांना कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
डॉ. पाटील यांनी भौतिकशास्त्र या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून प्राविण्यासह एम. एससी. ही पदवी प्राप्त केली असून पुढे त्याच विषयात पीएच. डी. सुद्धा प्राप्त केली आहे. डॉ. पाटील यांना शिक्षण, संशोधन व प्रशासन या क्षेत्रात व्यापक अनुभव आहे. नव्या कुलगुरु च्या निवडीसाठी राज्यपालांनी पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. एल. नरसिम्हा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राज्यपालांनी व्यक्तिश: घेतल्यानंतर डॉ. पाटील यांच्या निवडीची घोषणा झाली. (विशेष प्रतिनिधी)