३४ व्या अस्मितादर्श संमेलनाध्यक्षपदी प्रज्ञा दया पवार
By Admin | Published: December 27, 2016 07:13 PM2016-12-27T19:13:58+5:302016-12-27T19:13:58+5:30
अस्मितादर्शचे ३४ वे साहित्य संमेलन यंदा लातूरमध्ये १४ व जानेवारी २०१७ रोजी होत आहे.
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 27 - गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर होत असलेल्या अस्मितादर्शचे ३४ वे साहित्य संमेलन यंदा लातूरमध्ये १४ व जानेवारी २०१७ रोजी होत आहे. संमेलनाध्यक्षपदी डॉ. प्रज्ञा दया पवार यांची तर स्वागताध्यक्षपदी पत्रकार जयप्रकाश दगडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. संमेलनाचे उद्घाटन विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. माधव गादेकर यांनी येथे मंगळवारी पत्र परिषदेत दिली.
प्राचार्य डॉ. माधव गादेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य व तत्वज्ञानातून मानवतावादी प्रागतिक मूल्यविचार उजागर करण्याच्या भूमिकेतून लातूर येथील दयानंद सभागृहात हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. वैचारिक अभिसरणाच्या दृष्टीने एक नवा सामाजिक संदेश या संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरात जाणार आहे. संविधानाचे शिल्पकार आणि दलित साहित्याचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून अस्मितादर्श चळवळीचे प्रणेते आणि दलित साहित्याचे अध्वर्यु डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या प्रेरणेने संमेलनासाठी लातूरची निवड करण्यात आली आहे. अस्मितादर्श हे पुरोगामी विचाराचे नवे आकाश असून ते दलितेतरांनाही हितकारकच ठरले आहे. कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, प्रा. भालचंद्र फडके, प्रा.रा.ग. जाधव यांनी अस्मितादर्शची प्रशस्ती केली असून, राजा ढाले, पद्मश्री नामदेव ढसाळ, डॉ. जनार्दन वाघमारे, पद्मश्री दया पवार, डॉ. एलिनॉर झेलिएट, प्रा. केशव मेश्राम ते सिसिलिया कार्व्हालो, वाहरु सोनवणे, प्रा. भुजंग मेश्राम, फादर फ्रान्सिस दिब्रिटो आदींपासून नवोदितांपर्यंत सर्वांनाच अस्मितादर्शने प्रकाशाची दिशा दिली असल्याचेही डॉ. गादेकर म्हणाले.
आजवर डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. निर्मलकुमार फडकुले, दया पवार, नागराज मंजुळे, रामनाथ चव्हाण, लक्ष्मण गायकवाड, प्रा. केशव मेश्राम आदींनी अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. पत्र परिषदेला संमेलनाचे स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे, उपाध्यक्ष प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, कार्यवाह डॉ. अशोक नारनवरे, प्रा. युवराज धसवाडीकर, संजय घाडगे, डी.एस. नरसिंगे, डॉ. विजय अजनीकर आदींची उपस्थिती होती.
विशेष सरकारी वकील निकम यांच्या हस्ते उद्घाटन
लातुरात होत असलेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उद्घाटन शासनाचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होणार आहे. आतापर्यंत झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुशीलकुमार शिंदे, कुसुमाग्रज, प्रा.म.भि. चिटणीस, प्रा. ग.प्र. प्रधान, मधुमंगेश कर्णिक, भाई माधवराव बागल, प्रा.मे.पु. रेगे आदींनी केले आहे. आता ३४ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होत आहे.