प्रफुल्ल पटेल हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व

By admin | Published: May 15, 2017 06:00 AM2017-05-15T06:00:40+5:302017-05-15T06:00:40+5:30

देशातील कोणत्याही राजकीय पक्षात ज्याचा एकही शत्रू नाही, प्रत्येक पक्षात ज्यांचे केवळ मित्रच आहेत, असे प्रफुल्ल पटेल हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत

Praful Patel is Ajatshatru personality | प्रफुल्ल पटेल हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व

प्रफुल्ल पटेल हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील कोणत्याही राजकीय पक्षात ज्याचा एकही शत्रू नाही, प्रत्येक पक्षात ज्यांचे केवळ मित्रच आहेत, असे प्रफुल्ल पटेल हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी काढले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा जीवनपट छायाचित्रातून उलगडणाऱ्या ‘उडान’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन वरळीच्या ‘एनएससीआय’ सभागृहात झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी आणि सिनेदिग्दर्शक करण जोहर उपस्थित होते. तर, सभागृहात राजकारण, उद्योग, कला आणि क्रीडा विश्वातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी आणि प्रफुल्ल पटेल दोघेही विदर्भातील असल्याने एकमेकांशी जास्त राजकीय लढाई लढतो. राजकारणातील आपली भूमिका चोख बजावतानाही प्रफुल्ल पटेल यांनी कधी व्यक्तिगत जीवनातील मैत्रीत अंतर पडू दिले नाही.
मुंबईतील उद्योग जगतात जितक्या सहजतेने त्यांचा वावर असतो, तितक्याच सहजतने ते भंडारा-गोंदियातील सामान्य शेतकरी, शेतमजूर, महिला आणि कामगारांमध्ये मिसळतात. केंद्रात हवाई वाहतूक मंत्री म्हणून त्यांनी जे काम केले त्याचे आजही कौतुक होते. मुंबईत दाखल होणारे परदेशी पाहुणे मुंबई विमानतळाचे देखणे रूप व पायाभूत सुविधांमुळे माझेच कौतुक करतात. तेव्हा मी त्या पाहुण्यांना स्पष्ट
सांगतो की, या कामाचे श्रेय केवळ प्रफुल्ल पटेलांचे आहे. भारतातही जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करता येतात, हे प्रफुल्ल पटेलांनी दाखवून दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
‘उडान’ हा फक्त प्रफुल्ल पटेलांच्या फोटोंचा अल्बम नाही तर त्यांची जीवनगाथा असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. या कॉफीटेबल बुकची सुरुवातीची पाने प्रफुल्ल पटेलांचे वडील दिवंगत मनोहरभार्इंबाबत आहेत. हालाखीच्या परिस्थितीतून मनोहरभार्इंनी आपल्या जीवनाला वळण दिले.
पण, स्वत:च्या आयुष्याला वळण देतानाच इतरांच्या आयुष्याला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा हाच वारसा प्रफुल्ल पटेल पुढे चालवित आहेत, असे ठाकरे म्हणाले. प्रफुल्ल पटेलांकडे माणसे जोडण्याची किमया आहे, असे सांगताना उद्धव यांनी व्यासपीठाकडे हात करून आता
आम्ही विरोधी पक्षात आहोत, असे उद्गार काढले.
मात्र, पटेलांच्या शेजारीच मुख्यमंत्री बसले होते. तेव्हा विरोधी म्हणजे प्रफुल्ल पटेलांविषयी बोललो. मुख्यमंत्र्यांबरोबर आम्ही सत्तेतच आहोत, असे उद्धव यांनी
स्पष्ट करताच सभागृहात एकच
हशा पिकला.
प्रफुल्ल पटेल यांना वडिलांकडून उद्योग आणि सामाजिक कार्याचा वारसा मिळाला. तो त्यांनी समर्थपणे पुढे चालविलाच, शिवाय त्याला नवे आयामही जोडले, असे कौतुक अमिताभ बच्चन यांनी केले. नावाप्रमाणे चेहऱ्यावर कायम प्रफुल्लित करणारे हास्य आणि डोळ्यांत तितकाच खट्याळ भाव यामुळे प्रफुल्ल पटेल कायम इतरांना आपल्यात गुंतवून ठेवतात. मी स्वत: भंडारा-गोंदियात त्यांचे काम पाहिले आहे. त्यांचे हे काम जणू स्थानिकांच्या पाठीचा कणाच आहे, अशी स्तुती अमिताभ यांनी केली.
राजकारण्यांचा गोतावळा असो की कला-क्रीडा जगतातील पार्ट्या किंवा उद्योगजगतातील गाठीभेठी सर्वत्र प्रफुल्ल पटेलांचा वावर असतो. पण, या सर्वच ठिकाणी प्रफुल्ल पटेलांचा जो सहज आणि हसतमुख संचार असतो ते एक आश्चर्यच म्हणायला हवे, असे मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज, नीता अंबानी, उद्योजक उदय कोटक, गीतकार जावेद अख्तर यांनीही प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या ६७व्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठावर केक कापण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे, अमिताभ बच्चन, मुकेश अंबानींसह उपस्थित मान्यवरांनी विजय दर्डा यांचे अभिष्टचिंतन केले


माझ्या वयाच्या तेराव्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भंडाऱ्यात हजारोंचा जनसमुदाय जमा झाला होता. आपल्याच घरातील कोणी गेल्याप्रमाणे त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, या घटनेने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. तुम्ही जोपर्यंत एखाद्याच्या मनात स्थान निर्माण करत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी त्यांच्या डोळ्यांत अश्रू येत नाहीत. वडिलांचा हाच वारसा शेवटच्या क्षणापर्यंत पुढे चालवायचा आहे. लोकांच्या आयुष्यात थोडे जरी परिवर्तन घडवू शकलो तर स्वत:ला भाग्यवान समजेन, अशी भावना प्रफुल्ल पटेल यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात व्यक्त केली..

Web Title: Praful Patel is Ajatshatru personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.