सुप्रिया सुळेंनंतर नवाब मलिकांची प्रफुल्ल पटेलांनी घेतली भेट; कोणासोबत जाणार? म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 01:28 PM2023-08-15T13:28:44+5:302023-08-15T13:29:11+5:30
नवाब मलिक यांचे कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या भेटीला जात होते. यामुळे मलिक तुरुंगातून बाहेर आल्यावर अजित पवार गटासोबत जाणार असल्याचे तर्क लावले जात होते.
गेल्या दीड वर्षापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक यांना आजारपणावर उपचारासाठी जामिन मिळाला आहे. यानंतर मलिक यांना सोमवारी सायंकाळी रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली होती. आज अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मलिकांची भेट घेतली आहे.
नवाब मलिक यांचे कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या भेटीला जात होते. यामुळे मलिक तुरुंगातून बाहेर आल्यावर अजित पवार गटासोबत जाणार असल्याचे तर्क लावले जात होते. आता मलिक कोणत्या गटासोबत जाणार, राजकीय चर्चा झाली का यावर प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली आहे.
नवाब मलिक यांना सध्या उपचाराची गरज आहे. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामिन मिळाला आहे. यामुळे त्यांना राजकारणात घेण्यापेक्षा त्यांना विश्रांती देण्याची गरज आहे. यामुळे आम्ही कोणासोबत जाणार किंवा कोणतीही राजकीय चर्चा केलेली नाही. तर मलिक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांचे वजन कमी झालेले आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर माणसाची प्रकृती कशी असे तुम्हालाही माहिती आहे. त्यांना पुढे आणखी कुठे उपचार घ्यायचे आहेत, या बाबत चर्चा केल्याचे पटेल म्हणाले.
प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळं सुप्रीम कोर्टानं त्यांना दोन महिन्यांसाठी तत्पुरता जामीन मंजूर केला आहे. नवाब मलिक यांची कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवाब मलिक यांचं राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांकडून कुर्ल्यात जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच त्यांच्या समर्थनासाठी बाईक रॅलीही काढण्यात आली. यावेळेस नवाब मलिक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत हस्तांदोलन करत त्यांचे आभार मानले. सर्वोच्च न्यायालयात ११ ऑगस्ट रोजी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय चाचणी दरम्यान त्यांची १ किडनी निकामी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या कारणास्तव त्यांना दोन महिन्यांचा अंतरिम मिळाल्याचे म्हटले जात आहे.