प्रफुल्ल पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Published: May 28, 2016 01:31 AM2016-05-28T01:31:02+5:302016-05-28T01:31:02+5:30
राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या तीन जागांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या
मुंबई : राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या तीन जागांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची दिल्लीत चर्चा सुरू असून याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल व उमेदवारी जाहीर होईल, असे पटेल यांनी या वेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. विजयसिंह मोहिते पाटील आदी नेते या वेळी उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना पटेल यांनी मोदी सरकारने दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केलेल्या जाहिरातबाजीवर टीका केली. सामान्य माणूस महागाई, दुष्काळाने होरपळत असताना इतका मोठा गाजावाजा करत जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याची आवश्यकता नव्हती, असे त्यांनी सांगितले. मेक इन इंडियाच्या माध्यमातून लाखो कोटींचे एमओयू झाल्याचे दावे सरकार करत आहे. पण कोणत्या जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे उभे राहत आहेत हे सरकारने जाहीर करावे, ही गुंतवणूक म्हणजे पोकळ घोषणाबाजी असल्याचा आरोपही त्यांनी केला.