मान्यवरांनी उलगडले प्रफुल्ल पटेलांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू!
By admin | Published: May 16, 2017 01:18 AM2017-05-16T01:18:15+5:302017-05-16T01:20:09+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल यांच्या जीवनावरील ‘उडान-ए ग्राफीक ग्लीम्प्स थ्रू लाइफ आॅफ प्रफुल्ल पटेल’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल यांच्या जीवनावरील ‘उडान-ए ग्राफीक ग्लीम्प्स थ्रू लाइफ आॅफ प्रफुल्ल पटेल’ या छायाचित्रांच्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन रविवारी वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब( एनएससीआय) येथे झाले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांच्यापासून ते गीतकार जावेद अख्तर अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रफुल्ल पटेल यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन
आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, नीता अंबानी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘उडान-ए ग्राफीक ग्लीम्प्स थ्रू लाइफ आॅफ प्रफुल्ल पटेल’ या छायाचित्रांच्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी राजकारण, उद्योग, कला
आणि क्रीडा आदी क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीने सभागृह फुलून गेले होते.
या सोहळ्यातच प्रफुल्ल पटेल यांनी, ‘आज माझे मोठे बंधू व लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांचा वाढदिवस आहे. आता केक कापून आपण तो साजरा करू’, अशी घोषणा केली. मान्यवरांच्या उपस्थितीत विजय दर्डा यांनी केक कापला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे, मुकेश अंबानी, नीता अंबानी, महानायक अमिताभ बच्चन, खा.प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल आदींनी विजयबाबूंचे अभीष्टचिंतन केले. यावेळी लोकमत मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, पूर्वा कोठारी तसेच पुनित कोठारी व रचना दर्डा उपस्थित होते.
पटेलांच्या नेतृत्वामुळेच फुटबॉलमध्येही भारत आता पुढे येत असल्याचे नीता अंबानी म्हणाल्या. पटेल हे आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीत आज भारताचे मानांकन १७३ वरुन १०० वर आले आहे, हे सांगायला मला प्रचंड अभिमान वाटतो, अशा भावना नीता अंबानी यांनी व्यक्त केली.
जावेद अख्तर यांचे भावोद्गार
संवेदनशील गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी शबाना आझमी या समारंभाच्या आणखी एक आकर्षण होत्या. प्रफुल्लभाई लोकसंग्राहक आहेत, त्यांचे व्यक्तिमत्व रुबाबदार अन् विनम्र आहे. ते केवळ परिस्थितीनेच नाही तर मनाने त्याहीपेक्षा कितीतरी श्रीमंत आहेत, असे सांगताना, ‘प्रफुल्लभाई एक गुण तरी दुसऱ्यांसाठी सोडायला हवा होता’, असे कौतुक जावेद अख्तर यांनी केले. नागरी उड्डयण मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द अत्यंत वाखाणण्यासारखी होती. देशाच्या प्रत्येक मंत्रिमंडळात एक तरी ‘प्रफुल्ल पटेल’ असायला हवेत, अशी कौतुकाची थापही त्यांनी दिली.
चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी या निमित्ताने प्रफुल्लभार्इंविषयी मान्यवरांना बोलते केले. मंत्रीपदावर असताना विकासासाठी कटीबद्ध असणारा नेता, अशी ओळख त्यांनी निर्माण केली. आपल्या विभागासंदर्भात एखादा निर्णय मंजूर करण्यासाठी, तो विषय मंत्रिमंडळातील अन्य सहका-यांना पटवून देण्यासाठी पटेल अक्षरश: स्वत:ला झोकून देत, अशी आठवण चव्हाण यांनी सांगितली.
प्रफुल्ल पटेल आपल्या वडिलांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत अशी भावना ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांनी व्यक्त केली. मी आणि प्रफुल्ल पटेल यांना जोडणारा दुवा म्हणजे शरद पवार. एखाद्या व्यक्तीशी निरपेक्ष भावनेने मैत्र जपण्याचा प्रफुल्ल यांचा स्वभाव आहे, असे ते म्हणाले.
प्रफुल्ल पटेल म्हणजे मित्रांसाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्व असल्याचे सुप्रसिद्ध उद्योगपती उदय कोटक म्हणाले. राजकारण, व्यवसाय-उद्योग, शिक्षण, क्रीडा अशा विविध क्षेत्रात ते कार्यरत असतात. अशा विविध क्षेत्रात तितक्याच तळमळीने आणि आवडीने स्वत:ला झोकून देणे अवघड असते, असे कोटक म्हणाले.