निती आयोगाच्या बैठकीत फडणवीसांच्या कामाचे कौतुक
By admin | Published: April 24, 2017 03:01 AM2017-04-24T03:01:23+5:302017-04-24T03:01:23+5:30
निती आयोगाच्या बैठकीत येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या योजना आणि भविष्याची रणनीती याबाबत खुली चर्चा केली
नितीन अग्रवाल / नवी दिल्ली
निती आयोगाच्या बैठकीत येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या योजना आणि भविष्याची रणनीती याबाबत खुली चर्चा केली. राज्यात कृषि क्षेत्रात करण्यात आलेल्या कार्याबाबत यावेळी फडणवीस यांची पाठ थोपटण्यात आली.
फडणवीस यांनी यावेळी शेती क्षेत्रातील योजनांवर भाष्य केले. डाळींचे उत्पन्न वाढण्यासाठी त्यांनी काही सल्ले दिले. आयात धोरणात सुधारणा घडवून आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विदर्भ आणि मराठवाडा या दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या भागात सिंचन प्रकल्पांसाठी त्यांनी केंद्राकडे आर्थिक सहकार्याची मागणी केली. राज्यातील जलयुक्त शिवार योजनेचा उल्लेख करुन ते म्हणाले की, या योजनेमुळे कृषि
क्षेत्रात १२.५ टक्क्यांचा विकास दर गाठता आला. कृषि क्षेत्रातील गुंतवणूक, व्यावसायिक नेटवर्क आणि पायाभूत सुविधात झालेल्या सुधारणा याबाबत त्यांनी विस्ताराने माहिती दिली.
ग्राम पंचायतींना हायस्पीड इंटरनेटने जोडण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या महानेट योजनेसाठी केंद्र सरकारने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून चांगल्या सेवा देण्यात येत आहेत. प्रशासनाच्या या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. सार्वजनिक वायफाय आणि डिजिटल ग्राम यासारख्या राज्य सरकारच्या योजनांचीही त्यांनी माहिती दिली.
निती आयोगाच्या या बैठकीत महाराष्ट्र सरकारच्या कामाचे कौतुक झाले. कृषि आणि सिंचन क्षेत्रातील सरकारच्या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भारतात बदल घडवून आणण्यासाठी १५ वर्षांचा रोडमॅप सादर करण्यात आला.