लोकमतच्या उपक्रमांची प्रशंसा

By admin | Published: January 23, 2015 01:31 AM2015-01-23T01:31:28+5:302015-01-23T01:31:28+5:30

लोकमतने राबविलेल्या विविध लोकाभिमुख उपक्रमांची राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी गुरुवारी प्रशंसा केली़

Praise of Lokmat's ventures | लोकमतच्या उपक्रमांची प्रशंसा

लोकमतच्या उपक्रमांची प्रशंसा

Next

नांदेड: लोकमतने राबविलेल्या विविध लोकाभिमुख उपक्रमांची राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी गुरुवारी प्रशंसा केली़ तसेच जिल्ह्णातील घोगरवाडी, शिवशक्तीनगर, कोलामपोडे, शिवरामखेडा अन् शिवनगर तांड्यावर लोकमतने लोकसहभागातून साकारलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती राज्यपाल राव यांनी आत्मियतेने जाणून घेतली़
राज्यपालांनी गुरुवारी सकाळी लोकमतशी संवाद साधला़ यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार उपस्थित होते़ किनवटच्या जंगलातील नैसर्गिक मध अन् बांबूपासून बनविलेल्या वस्तूंना लोकमतने प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वप्रथम दालन खुले केले़ लोकमत आयोजित प्रदर्शनात दोन दिवसांत नांदेडकरांनी ५ क्विंटल मधाची खरेदी केली़ ज्याद्वारे आदिवासी शेतकऱ्यांना सुमारे पावणेदोन लाख रुपयांची मदत झाली़ यासह २ आॅक्टोबर २०१२ पासून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची सारांश माहिती राज्यपालांना देण्यात आली़ त्याचे कौतुक करीत राज्यपाल सी़ विद्यासागर यांनी आदिवासी कलेला वाव मिळाला पाहिजे, असे सांगितले़ सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन मुंडे, आदिवासी शेतकरी गुलाबराव मडावी, विजय मडावी यांनीही राज्यपालांशी संवाद साधला. प्रारंभी लोकमतचे उपवृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे यांनी उपक्रमांची माहिती दिली़ (प्रतिनिधी)

श्रमदानातून उभारला बंधारा!
गावात एखादी योजना वा थेट मदत पोहचविण्याऐवजी आधी लोकांनीच गावासाठी एक तास द्यावा़ श्रमदान करावे, असे ठरले़ त्यातूनच शिवनगर तांडा येथे मातीनाला बंधारा उभारण्यासाठी प्रत्येक घरातील एक जण श्रमदानासाठी पुढे आला़ सुमारे ५ लाख रुपये खर्च आला असता इतका बंधारा केवळ श्रमदानातून उभाही राहिला़ बंधाऱ्यात सुमारे ४२ हेक्टरमधील पाणी जमा होईल़ त्याची साठवण क्षमताही १़८० मीटर इतकी असणार आहे़

लोकमतचे लोकाभिमुख उपक्रम उदाहरण देण्यासारखे आहेत़ विशेषत: शिवरामखेड्याच्या मधसंकलन समितीला प्रदर्शनाच्या माध्यमातून बळकटी आली़ आदिवासी प्रकल्प कार्यालय तसेच जिल्हा प्रशासनही मध व बांबूच्या वस्तू निर्मिती, प्रशिक्षण तसेच विक्रीसाठी कायम व्यवस्था उभी करेल़
- धीरजकुमार, जिल्हाधिकारी , नांदेड

 

Web Title: Praise of Lokmat's ventures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.