बचत गटांसाठीच्या 'प्रज्ज्वला'चा नंदूरबारपासून प्रारंभ; पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 06:17 PM2019-06-14T18:17:57+5:302019-06-14T18:18:22+5:30
'राज्यामध्ये सुमारे ३ लाख बचत गट असून त्यांच्याशी सुमारे साठ लाख महिला जोडलेल्या आहेत.'
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यातील बचत गटांसाठी आखलेल्या प्रज्ज्वला योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ शनिवार, दि. १५ जून रोजी नंदूरबार येथे होत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ होईल. या पहिल्या टप्प्यात प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये एक दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाणार आहे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली.
१५ जून ते ३० आॅगस्ट दरम्यानच्या कालावधीत प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण केला जाणार आहे. शुभारंभ कार्यक्रमात मुनगंटीवार यांच्या व्यतिरिक्त नंदूरबारचे पालकमंत्री जयकुमार रावळ, खासदार हीना गावित, आमदार विजयकुमार गावित यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
"राज्यामध्ये सुमारे ३ लाख बचत गट असून त्यांच्याशी सुमारे साठ लाख महिला जोडलेल्या आहेत. हे बचत गट आर्थिक सक्षमीकरणाचा कणा असल्याने आयोगाने बचत गटांना आणखी सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यातून प्रज्ज्वला योजना आकारास आली आहे. पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण, दुसरया टप्प्यात 'एक जिल्हा, एक वस्तू'ची क्लस्टर्स निर्मिती आणि तिसरया टप्प्यात बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यासाठी बचत गट बाजारांची उभारणी असे नियोजन आहे," अशी माहिती विजया रहाटकर यांनी दिली.
या योजनेसाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.