आम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकरांचा मविआवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 05:53 AM2024-03-30T05:53:51+5:302024-03-30T06:57:16+5:30
नव्या आघाडीचे संकेत; २ एप्रिलला सर्व स्पष्ट करणार
मुंबई : महाविकास आघाडीत आम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत येत्या दोन एप्रिल रोजी आम्ही सगळे स्पष्ट करणार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
जोपर्यंत ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांच्याशी चर्चा सुरू होती, तोपर्यंत सर्व काही सकारात्मक होते. चर्चा पुढे जात होती. पण, नंतर कुणी तरी कुणासाठी आम्हाला वापरून घेत असल्याचे दिसू लागले, असा आरोपही आंबेडकर यांनी केला. माझे दरवाजे आजही बंद झालेले नाहीत. सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत. आम्ही विविध संघटनांशी चर्चा करत आहोत, त्यांच्याबरोबर कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची, याचा अजेंडा तयार केला जातोय, असेही ते म्हणाले.
आंबेडकर म्हणाले, शिवसेना आणि काँग्रेस यांचे सूत जुळलेले नाही, हे मी आधीपासून सांगत होतो, ते आता उघड होऊ लागले आहे. राज्यात ज्या पद्धतीने विरोधी पक्ष उभा राहिला पाहिजे, तो राहत नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधी आघाडी उभी राहावी, हे आमचे मत होते. पण, आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. आता आम्ही इतरांना सोबत घेऊन नवी आघाडी करत आहोत. कुणाला बाजुला टाकू नये, सर्वांना सोबत घेऊन काम करावे, असे आमचे म्हणणे आहे, असेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
राऊत चुकीची माहिती देत आहेत
संजय राऊत महाविकास आघाडीच्या नावाने चुकीची माहिती देत आहेत, ते आघाडीत बिघाडी करण्याचे काम करत आहेत. आमच्याकडे तीन जागांचा प्रस्ताव आला होता, असे आंबेडकर यांनी सांगितले.
मराठा समाज आता एकच उमेदवार देणार
मराठा समाज गावागावातून उमेदवार देणार होते. आता प्रत्येक मतदारसंघातून एकच उमेदवार देण्याचे ठरत आहे. जरांगे-पाटील यांच्याकडून उद्यापर्यंत माहिती येऊ शकते, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
लढाई वंचित विरुद्ध भाजपच
पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याची मुदत संपत होती. त्यामुळे आम्ही पहिल्या टप्प्याचे उमेदवार जाहीर केले. एका जागेवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. भाजपला मोकळे रान देऊ इच्छित नव्हतो, म्हणून आम्ही उमेदवार दिले. ही लढाई वंचित विरूद्ध भाजप, अशी असेल, असेही ते म्हणाले.