मनोज जरांगेंनी निजामी मराठ्यांपासून सावध राहावं, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:17 PM2024-01-24T12:17:31+5:302024-01-24T12:29:37+5:30
Maratha Reservation : ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षण वादावर मी मध्यस्थी करण्यात तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी धाराशिव येथे भाष्य केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचे असून त्यांनी सरकारला जेरीस आणले आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत निजामी मराठ्यांपासून सावध राहायला हवे, कारण ते जरांगे यांचं घात करतील असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील हे ज्या आंदोलनात चालतात, त्या आंदोलनात त्यांनी मोजकी लोक सोडून सामान्य लोकात जेवण केलं पाहिजे, असा एक सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे.
याचबरोबर, गेल्या काही दिवसांत आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा विरोधात ओबीसी असा वाद पाहायला मिळाला. यावर सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षण वादावर मी मध्यस्थी करण्यात तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. याशिवाय, प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.
भारत देशात धर्माचा प्रचार प्रसार करायला पाहिजे. पण त्या अगोदर आपण कुठल्या पदावर आहोत हे पाहायला हवे. रामाची प्राणप्रतिष्ठा करायला विरोध नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन प्राणप्रतिष्ठा करायला हवी होती. पण आपले पंतप्रधान पद जाईल या भीतीपोटी त्यांनी पदावर राहूनच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
रोहित पवारांच्या ईडी कारवाईवर प्रतिक्रिया..
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईवर सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण काही केलं नसेल तर घाबरू नका, आपली संपत्ती जाहीर करा, असे मत देखील प्रकाश आंबेडकर यांनी रोहित पवार यांच्या ईडी कारवाईवरून व्यक्त केले आहे.