'पडळकरांना शुभेच्छा... निवडणुकीनंतर 'गोपीचंद' पुन्हा वंचितमध्ये येतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 05:13 PM2019-09-30T17:13:17+5:302019-09-30T17:14:39+5:30
पडळकर यांच्या नवीन वाटचालीस शुभेच्छा. गोपीचंद हे वंचित आघाडीत आले. त्यांना आम्ही महत्त्वाचं पद दिलं होतं
मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर आणि काँग्रेस आमदार काशीराम पावरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी उपस्थितांना संबोधित केलं. माझा वंचित बहुजन आघाडीत कुठलाही वाद नाही किंवा प्रकाश आंबेडकर यांच्याशीही माझे चांगले संबंध आहेत, असे म्हणत समाजाच्या कल्याणासाठी मी भाजपात प्रवेश करत असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.
गोपीचंद पडळकर यांच्या प्रवेशानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी गोपीचंद पडळकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, लोकसभेला ते आमच्यासोबत होते, आता भाजपात गेले आहेत. मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा ते वंचित बहुजन आघाडीते येतील, अशी अपेक्षा करतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. वंचित बहुजन आघाडीने आत्तापर्यंत 22 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यांनंतर, आज एकूण 180 उमेदवारांची जाहीर करण्यात आली आहे. तसेच उर्वरीत यादी उद्या जाहीर होईल. त्यानुसार उद्या रात्रीपर्यंत राज्यातील 288 उमेदवारांची यादी घोषित होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
पडळकर यांच्या नवीन वाटचालीस शुभेच्छा. गोपीचंद हे वंचित आघाडीत आले. त्यांना आम्ही महत्त्वाचं पद दिलं होतं. पण ते आज आमच्या संघटनेत नाहीत. आमच्याकडे आल्यानंतर पडळकर बदलल्याचे दिसून आले होते. पण, निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपात गेले. मात्र, निवडणूक संपल्यानंतर ते पुन्हा वंचितमध्ये येतील, अशी अपेक्षा करतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.