“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 01:12 PM2024-05-24T13:12:30+5:302024-05-24T13:15:36+5:30
Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात ४८ पैकी किती जागा मिळतील, याचा प्रकाश आंबेडकर यांनी थेट आकडाच सांगितला.
Prakash Ambedkar: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता देशातील काही ठिकाणी दोन टप्प्याचे मतदान होणार आहे. यानंतर ०४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. तर, महायुतीत भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत दोन आघाड्यांमध्ये आहे, असे सांगताना, वंचित बहुजन आघाडीला ४८ पैकी ३ जागा मिळतील, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली
पंतप्रधान मोदी प्रचारादरम्यान वैयक्तिक हल्ले करत आहेत, जे वाईट आहे. पंतप्रधानांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा खालावली आहे. सत्ताधारी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणेचा कसा वापर करतात, हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचे रूपांतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखे केले आहे. पंतप्रधान मोदी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रचार करतात. विधानसभा निवडणुकीतही तेच प्रचाराला जातात. स्थानिक पातळीवरील निवडणुकीतही पंतप्रधान मोदी हेच करतात, या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला. प्रकाश आंबेडकर इंडियन एक्स्प्रेसशी बोलत होते.
दरम्यान, तत्कालीन पंतप्रधानांनी आपापल्या पक्षांचा प्रचार केला हे खरे असले तरी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली आहे, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.