प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 04:21 PM2024-10-18T16:21:18+5:302024-10-18T16:24:33+5:30
केंद्राच्या परवानगीशिवाय ही भेट झाली होती का, जर नसेल तर ते भेटले का होते याचा खुलासा मतदारांसमोर आला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसनं याचा खुलासा केला पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
मुंबई - बाबा सिद्दीकी यांची उघडपणे हत्या करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा शहरात गँगवॉर सुरू झालं का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनीशरद पवार यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. पवार मुख्यमंत्री असताना त्यांची दुबईत दाऊदची भेट झाली होती, या भेटीला तत्कालीन केंद्र सरकारची परवानगी होती का, याचे जुने रेकॉर्ड जनतेसमोर आणावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंबईत पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १९८८ ते १९९१ शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते, या काळात शरद पवार एका दौऱ्यासाठी परदेशात गेले होते. पवार भारतातून लंडनला गेले, तिथून कॅलिफोर्नियाला २ दिवस थांबले. कॅलिफोर्नियात त्यांनी एक बैठक घेतली. ही बैठक कुणासोबत झाली याचा खुलासा व्हावा. तिथून ते लंडनला आले. २ दिवसांनी ते दुबईला गेले. दुबई एअरपोर्टवरच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत भेट झाली, तिथे दाऊदने पवारांना सोन्याचा हार भेट दिला, तिथून संध्याकाळच्या विमानाने शरद पवार लंडनला आले आणि २ दिवसांनी पुन्हा ते भारतात परतले. मुख्यमंत्री या नात्याने केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कुणीही परदेशात दौरा करू शकत नाही. त्यावेळच्या सरकारने शरद पवारांच्या दौऱ्याला मान्यता दिली होती का? कॅलिफोर्नियातील बैठक आणि दाऊदची भेट याला परवानगी केंद्राने दिली होती का, जर दिली होती तर त्या भेटीचा अहवाल केंद्राला सुपूर्द केला होता का..याचा खुलासा आताच्या केंद्र सरकारने केला पाहिजे अशी मागणी केली त्यांनी केली.
तसेच ज्या भागात पॅलेस्टाईन आणि इस्त्रायलचा संघर्ष सुरू आहे. केंद्र सरकार आतून इस्त्रायलसोबत आणि बाहेरून पॅलेस्टाईनसोबत आहे. मी ज्या काळाचं सांगतोय, तेव्हाही इराण, पॅलेस्टाईन चर्चेत होतं, त्यावेळी भारतातील मुस्लीम काही जणांना सोडले तर ते त्यांच्या जाळ्यात अडकले नव्हते. आज इस्त्रायलचा मुद्दा असल्याने काही भारतीय प्रतिक्रिया देऊ शकतात अशी परिस्थिती आहे. ते रोखायचे असेल तर याचा खुलासा होणं गरजेचे आहे. पुन्हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगची मालिका महाराष्ट्रात सुरू झालीय आणि दुसरी बाब म्हणजे कॅनडा, यूएस आणि इंडियाचं जो काही वाद सुरू आहे त्यामुळे मुंबई, महाराष्ट्र हॉटसीटवर आहे. कॅलिफोर्निया बैठक, दाऊदच्या भेटीची शरद पवारांना परवानगी होती का? जर नसेल तर ते भेटले का होते याचा खुलासा मतदारांसमोर आला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसनं याचा खुलासा केला पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात शांतता राखायची असेल तर या पक्षांना मतदान करायचे की नाही यावर मतदारांनी विचार करायला हवा. अजून खूप काही आहे. पुढील पत्रकार परिषदेत बोलू. महाराष्ट्रात शांतता असायला हवी. केंद्र सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या गोष्टीचा खुलासा होईल. आम्ही राजकारणी, निवडणुकीच्या तोंडावर हे विधान जाणीवपूर्वक करतोय. कारण येणारा काळ दिसतोय. माझे आजोबा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना १९५४ साली तेव्हाच्या केंद्र सरकारने गंभीरतेने घेतले नाही त्यामुळे १९६२ चं युद्ध झालं. येणारा काळ कठीण राहणार आहे. त्यासाठी योग्य माणसं महाराष्ट्राच्या सत्तेवर बसली तर कठिण काळाला तोंड देता येईल. नाहीतर १९९० आणि २००० सालाची पुनरावृत्ती होईल असं आम्हाला वाटतं. केंद्र सरकारमध्ये भाजपा आहे, गृहखाते त्यांचे आहे त्यांनी हे जुने रेकॉर्ड बाहेर काढावे. पुढील ५ वर्षासाठी जे सरकार बनेल, ही परिस्थिती पाहता मतदान झाले पाहिजे म्हणून मी हे सांगतोय. भारताकडून आज जी परिस्थिती आहे त्यात पुन्हा १९९० ची परिस्थिती दिसून येते. मध्यंतरी जे बॉम्बस्फोट, गोळीबारीचे प्रकार होते ते थांबले होते. मागील काही दिवसांपासून हे पुन्हा सुरू झाले. बाबा सिद्दीकींची उघडपणे हत्या करण्यात आली. ही परिस्थिती पाहता मागचा इतिहास आपल्याला पाहायला हवं असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.