वंचितच्या मविआतील समावेशावर १५ दिवसांत निर्णय घ्या; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 02:50 PM2023-07-06T14:50:46+5:302023-07-06T14:52:36+5:30
Prakash Ambedkar News: आमची तयारी पूर्ण झाली आहे. वंचितसोबत उद्धव ठाकरेंना लढायचे असल्यास लवकर निर्णय घ्यावा लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
Prakash Ambedkar News: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील समावेशाबाबत उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत उद्धव ठाकरेंनी पुढील १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी. लवकर निर्णय झाला नाही, तर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे आहोत, या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम दिल्याचे सांगितले जात आहे.
वंचितच्या मविआतील समावेशाबाबत उद्धव ठाकरेंनी १५ दिवसांत स्पष्ट करावे
वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत उद्धव ठाकरेंनी पुढील १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी यासंदर्भात काय बोलणे झाले, हे स्पष्ट करावे आता निवडणुका जवळ आल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी आता न्यायालयीन लढाईच्या पुढे जात भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आमचा उद्धव ठाकरेंमुळे भ्रमनिरास झालेला नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटांवर भाष्य केले आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांची स्तुती केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, वंचित आणि उद्धव ठाकरेंना सोबत लढायचे असल्यास लवकर निर्णय घ्यावा लागेल. यासाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे. शरद पवारांवर होत असलेल्या 'पेरलं तेच उगवलं' या आरोपांमध्ये तथ्य नाही. राजकारणात परिस्थितीनुरूप राजकीय तोडफोडीचे निर्णय घ्यावे लागतात. पवारांनी आतापर्यंत राजकारणासाठी जे केले, ते आता त्यांच्यासंदर्भात घडले आहे. चौकशांच्या छायेखालील लोक अजित पवारांसोबत गेलेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.