"उत्तर नसेल तर त्यांना सेवेतून सरळ निलंबित करा"; आंबेडकरांची CM फडणवीसांकडे मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 21:04 IST2025-01-02T21:01:29+5:302025-01-02T21:04:00+5:30
Prakash Ambedkar on Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांच्या भूमिकांवरच शंका उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी केली आहे.

"उत्तर नसेल तर त्यांना सेवेतून सरळ निलंबित करा"; आंबेडकरांची CM फडणवीसांकडे मोठी मागणी
Santosh Deshmukh Prakash Ambedkar News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या एकूण तपासावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शंका उपस्थित केली आहे. पोलीस खाते पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे, असा गंभीर दावा करत प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपासातील काही मुद्दे आंबेडकरांनी मांडले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही. देवेंद्र फडणवीस तुमचं पोलीस खातं पूर्णपणे करप्ट झाले आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
आंबेडकर म्हणाले, 'पुढे काय करणार? तर केस सीबीआयला देणार'
प्रकाश आंबेडकर यांनी एक पोस्ट लिहित म्हटले आहे की, "देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्य प्रकरणी पहिल्यांदा स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. त्यांना देशमुख हत्येप्रकरणी काही सापडले नाही. त्यानंतर पोलीस अधिक्षकांनी चौकशी केली, त्यांना काही सापडले नाही. त्यानंतर CID ने चौकशी केली, त्यांनाही काही सापडले नाही. आणि आता चौकशीसाठी SIT स्थापन केली आहे. पुढे काय करणार ? तर ही केस CBI ला देणार", अशी उपरोधिक टीका करत पोलिसांच्या तपासाबद्दलच्या भूमिकेवर आंबेडकरांनी शंका उपस्थित केली आहे.
"तपास का झाला नाही, असे अधिकाऱ्यांना विचारा"
ते पुढे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस तुमचं पोलीस खातं पूर्णपणे करप्ट झाले आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नुसत्या कमिट्या निर्माण करून उपयोग नाही. ज्यांनी या प्रकरणाचा तपास योग्य केला नाही, त्यांना विचारा की तपास का झाला नाही? याचे उत्तर नसेल तर त्यांना सेवेतून सरळ निलंबित करा", अशी मोठी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्य प्रकरणी पहिल्यांदा स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. त्यांना देशमुख हत्येप्रकरणी काही सापडले नाही. त्यानंतर पोलीस अधिक्षकांनी चौकशी केली, त्यांना काही सापडले नाही. त्यानंतर CID ने…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 2, 2025
संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मात्र, यातील प्रमुख आरोपीसह तीन जण अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्यांच्यासंदर्भात नोटीसही काढली आहे. मात्र, २२ दिवसांनंतरही आरोपी मोकाट असल्याने तपासावर आणि पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.