सरकारमुळे अत्याचार करणाऱ्यांची हिंमत वाढतेय- प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:53 PM2018-06-15T15:53:33+5:302018-06-15T15:53:33+5:30
जामनेर घटनेतील पीडितांच्या कुटुंबावर गुन्हा मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे.
मुंबई: जामनेरमध्ये मातंग समाजाच्या दोन मुलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेवरून भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली. सरकार अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई न करता केवळ समोरच्या घटनांकडे पाहत बसते. दबाव निर्माण झाला तरच सरकारकडून कारवाई केली जाते. त्यामुळे तुम्ही अत्याचार करा, तुम्हाला काही होणार नाही , असा संदेश समाजात जातोय.
जामनेर घटनेतील पीडितांच्या कुटुंबावर गुन्हा मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे. आम्ही त्यांची लवकरच भेट घेणार आहोत. जेणेकरून या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी. तसेच या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होणे, आवश्यक आहे. त्यामुळे जनतेत योग्य तो संदेश जाईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटवरून या घटनेचा निषेध केला. महाराष्ट्रातील या दलित मुलांचा गुन्हा केवळ इतका आहे की, त्यांनी 'सवर्ण' समाजाच्या विहिरीत आंघोळ केली. RSS / भाजपाच्या मनुवादाच्या विषारी राजकारणाविरोधात जर आपण आवाज उठवला नाही तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.