प्रकाश आंबेडकरांचं छगन भुजबळांना निमंत्रण; राज्यभरात काढणार आरक्षण बचाव यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 08:43 AM2024-07-23T08:43:40+5:302024-07-23T08:45:08+5:30
राज्यात मराठा-ओबीसी आरक्षण संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता ओबीसी नेत्यांपाठोपाठ प्रकाश आंबेडकरांनीही एससी, एसटी, ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचं महाराष्ट्रात आयोजन केले आहे.
मुंबई - राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी आरक्षण संघर्षावरून आता वंचित बहुजन आघाडीकडून आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात निघणाऱ्या यात्रेला मंत्री छगन भुजबळ यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं अशी मागणी करत गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन, उपोषण करत आहेत. मात्र त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांकडून विरोध होत आहे.
त्यातच आता प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेत राज्यात आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन केले आहे. एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाच्या लढाईसाठी वंचित बहुजन आघाडीची ही यात्रा राज्यभरात फिरणार आहे. याबाबत प्रकाश आंबेडकरांनी मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहिलं आहे. त्यात म्हटलंय की, आरक्षण बचाव यात्रेसाठी आम्ही तुम्हाला निमंत्रित करत आहोत. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आणि गावांत ही यात्रा निघेल. या यात्रेतून वंचित घटकांचे प्रश्न आणि एससी, एसटी, ओबीसी आरक्षण यावर जनजागृती करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितले.
या यात्रेतून ओबीसी आरक्षण वाचवणं, पदोन्नतीमध्ये एससी, एसटी, ओबीसी आरक्षण देण्याबाबत, एससी, एसटी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करणेबाबत, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विस्तार करणं, १०० ओबीसी उमेदवारांना निवडणुकीत प्राधान्य देणं आणि ५५ लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करणं यासारख्या विविध मागण्या आरक्षण बचाव यात्रेतून मांडण्यात येणार आहेत. २५ जुलैला दादरच्या चैत्यभूमीपासून या यात्रेची सुरुवात होईल. त्याचदिवशी ही यात्रा पुण्यातील फुले वाडा येथे पोहचेल.
I emailed and invited Shri @ChhaganCBhujbal to the आरक्षण बचाव यात्रा initiated by Vanchit Bahujan Aaghadi.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 22, 2024
I have invited him to join me in Kolhapur on July 26, 2024 or at any time during the course of the Yatra.
I look forward to him joining the आरक्षण बचाव यात्रा. pic.twitter.com/j96eewEo73
दरम्यान, आपण ओबीसी नेते आहात, त्यामुळे ओबीसी समाजाच्या हितासाठी तुमचा सहभाग यात्रेत असावा. त्यामुळे २६ जुलैला कोल्हापूरात पोहचणाऱ्या या यात्रेला तुम्ही आर्वजून उपस्थित राहावे किंवा यात्रेदरम्यान कुठल्याही दिवशी तुम्ही सहभागी व्हावं असं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी मंत्री छगन भुजबळांना दिले आहे. सध्या मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मात्र सरकारकडून कुठलाही संपर्क होत नाही असा आरोप जरांगेंनी केला आहे. तर छगन भुजबळ राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत असंही जरांगेंनी म्हटलं आहे.