...अन् प्रकाश आंबेडकर बैठकीतून निघाले; मविआच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 09:20 AM2024-03-07T09:20:28+5:302024-03-07T09:21:10+5:30
मविआने आम्ही दिलेले प्रस्ताव आणि जागेच्या संदर्भात वेळ मागून घेतली आहे. पुढच्या आठवड्यात बसून चर्चा करु, असे मविआच्या वतीने सांगण्यात आले अशी माहिती सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बुधवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला मविआच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. परंतु पहिल्या बैठकीपासून आजपर्यंत जागांच्या संदर्भात कोणतीही चर्चा मविआने केली नसून, आम्ही सादर केलेला प्रस्ताव आणि जागांच्या संदर्भात मविआने वेळ मागून घेतली आहे. त्यानंतर बैठकीतून प्रकाश आंबेडकर बाहेर पडले. याबाबत पुढील बैठकीत काही गोष्ट स्पष्ट होण्याची शक्यता असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे.
या बैठकीत आत्तापर्यंत ज्या मुद्यांवर चर्चा होऊ शकली नाही, ते मुद्दे पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकली नाही. मनोज जरांगेंच्या आंदोलनाविषयी मविआची भूमिका काय आहे, याची देखील चर्चा झाली नसल्याचे मोकळे यांनी म्हटले आहे. सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे की, मागील वेळी आम्ही मविआला प्रस्ताव दिला त्यात एक महत्वाचा अजेंडा होता. तो म्हणजे ओबीसी समाजाला लोकसभेत ४८ पैकी १५ जागा दिल्या पाहिजेत. पण, यावर चर्चा होऊ शकली नाही. तीन उमेदवार अल्पसंख्याक समाजातील असावेत, असा प्रस्ताव वंचितने दिला होता. या वरही चर्चा झाली नाही. भाजपाला पराभूत करण्यासाठी मविआ एकत्र येऊन लढत आहे. भाजपाच्या हुकूमशाही विरोधात लढत आहे. त्यामुळे मविआचा भाग असलेला पक्ष भाजपासोबत निवडणुकीच्याआधी किंवा निवडणुकीनंतर कोणत्याही प्रकारे समझोता, युती आघाडी करणार नाही असे लेखी वचन घटक पक्षांनी द्यावे, असाही प्रस्ताव दिला होता. मात्र, त्या वरही चर्चा होऊ शकली नाही असं वंचितकडून सांगण्यात आले.
#WATCH | Leaders of Maha Vikas Aghadi meet to discuss seat-sharing for Lok Sabha elections, in Mumbai
— ANI (@ANI) March 6, 2024
Prakash Ambedkar, President of Vanchit Bahujan Aaghadi, is also attending the meeting pic.twitter.com/65rk4zqUTo
तसेच जेवणाचा ब्रेक झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर बैठकीत म्हणाले, मी आघाडीसोबत आहे, पण मला असं वाटतं आघाडीच माझ्यासोबत नाही. ही आघाडी व्हावी, ती शेवटपर्यंत टिकून राहावी आणि भाजपाचा पराभव या आघाडीने करावा. यासाठी हवं असेल तर माझी अकोल्याची जागा द्यायला मी तयार आहे. मात्र, तुम्ही काही बोला आणि तोडगा काढा आपण पुढे जाऊ असं आंबेडकरांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पहिल्या बैठकीपासून वंचितचे प्रतिनिधी मविआला विचारत आहेत. तुम्ही आम्हाला काय देणार, कुठल्या जागा देणार, ते आम्हाला सांगा. त्यावर आम्हाला चर्चा करता येईल. मात्र, अद्यापही जागेच्यासंदर्भात कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे मविआने आम्ही दिलेले प्रस्ताव आणि जागेच्या संदर्भात वेळ मागून घेतली आहे. पुढच्या आठवड्यात बसून चर्चा करु, असे मविआच्या वतीने सांगण्यात आले असून, काहीतरी चांगलेच होईल अशी आशा वंचितकडून व्यक्त करण्यात आली आहे.