Maharashtra Politics: “इतराचं काही देणंघेणं नाही, माझी युती शिवसेनेबरोबर”; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 12:36 PM2023-01-28T12:36:56+5:302023-01-28T12:38:02+5:30
Maharashtra Politics: महाविकास आघाडीसोबत जाणार का, या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी रोखठोक भूमिका स्पष्ट केली.
Maharashtra Politics: हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर करण्यात आली. यानंतर यावरून राजकीय वर्तुळात बरेच तर्क-वितर्क लावले जात आहेत. युतीच्या घोषणेनंतर दोनच दिवसांत संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात वाकयूद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. तसेच वंचितसोबतच्या युतीमुळे शिवसैनिक नाराज असल्याचा दावाही केला जात आहे. यातच शरद पवार (Sharad Pawar) यांनीही ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवर भाष्य केले. यावर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
युती केल्यापासून मागील काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीत काही खटके उडताना दिसत आहेत, काही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याकडे आपण कसे पाहता? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आला. यावर, प्रश्न तो नाही, प्रश्न असा आहे की माझी युती शिवसेनेबरोबरची आहे आणि ती कायम आहे. त्यामुळे मी तिथपर्यंतच मर्यादित आहे आणि मला इतराचे काही देणेघेणे नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली.
आता मी काही त्यावर बोलत नाही
महाविकास आघाडीत जाण्याची इच्छा नाही का? असा प्रश्नही आंबेडकरांना विचारण्यात आला. यावर, तो मुद्दा मी ज्यावेळी स्पष्ट करायचा तेव्हा मी करेन, आता मी काही त्यावर बोलत नाही. मला जे बोलयाचे होते ते मी बोललो आहे. माझ्या पक्षाने काय बोलवे हे माझा पक्ष ठरवतो. आमच्या दृष्टीने जे आम्हाला मांडायचे होते, ते मांडून झालेले आहे. पुढचा काळ जसा जाईल त्यानुसार आम्ही त्यावर प्रतिक्रिया देत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.
वंचितसोबतच्या आघाडीचा प्रस्ताव आमच्यासमोर नाही
शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना ठाकरे गट आणि वंचित युतीवर प्रतिक्रिया दिली. ठाकरे गट आणि वंचित यांच्या चर्चेत आम्ही कुठे नव्हतो. आमच्या ज्या चर्चा झाल्या त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरे जावं अशी आमची मानसिकता आहे. तो प्रयत्न आम्ही सुरू ठेवणार आहोत. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही. त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रस्ताव आमच्यासमोर नसल्यामुळे कुणाला किती जागा वाटप होणार, यावर चर्चाच होऊ शकत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"