राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी नाकारलं; "भाजपा अन् RSS नं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 07:53 PM2024-01-17T19:53:57+5:302024-01-17T19:54:33+5:30

धर्म, पंथ याला देशापेक्षा सर्वोच्च ठेवणाऱ्या भाजपा आणि आरएसएसने त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या सोहळ्यावर कब्जा केला आहे

Prakash Ambedkar rejected invitation for the inauguration of Ram Mandir in Ayodhya | राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी नाकारलं; "भाजपा अन् RSS नं..."

राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी नाकारलं; "भाजपा अन् RSS नं..."

मुंबई - येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. त्याचसोबत अनेक मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही रामजन्मभूमी न्यासकडून सोहळ्याचे आमंत्रण पाठवण्यात आले. परंतु हा धार्मिक सोहळा निवडणुकीच्या फायद्यासाठी राजकीय प्रचार बनला आहे असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी सोहळ्याला जाण्यास नकार दिला. 

प्रकाश आंबेडकरांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला पत्र लिहून कळवलं की, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मला आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. परंतु या कथित सोहळ्यात मी सहभागी होणार नाही. कारण भाजपा आणि आरएसएसने या सोहळा हाती घेतला आहे. एका धार्मिक सोहळ्याचा राजकीय फायद्यासाठी राजकीय प्रचार बनला आहे. माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे जर राजकीय पक्ष धर्म, पंथ याला देशापेक्षा सर्वोच्च ठेवतील तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येऊ शकते. कदाचित हे स्वातंत्र्य आपण कायमचे गमावून बसू असं सांगितले होते. 

आज बाबासाहेबांनी जी भीती व्यक्त केली होती ती खरी ठरत आहे. धर्म, पंथ याला देशापेक्षा सर्वोच्च ठेवणाऱ्या भाजपा आणि आरएसएसने त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या सोहळ्यावर कब्जा केला आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली. पत्राच्या शेवटी आंबेडकरांनी जय फूले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम असा उल्लेख केला आहे. 

“होय, निमंत्रण मिळाले, रामलला दर्शनासाठी अयोध्येला जाणार”

राम मंदिराच्या भव्य सोहळ्यासाठी देशातील मान्यवरांसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रणे देण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसने राम मंदिराच्या सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांनाही या सोहळ्याचे आमंत्रण आले. त्यावर पवारांनी पत्र लिहून म्हटलंय की, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम केवळ भारताचे नाही, तर जगभरात पसरलेले कोट्यवधी भाविक आणि श्रद्धाळूंच्या आस्थेचे प्रतिक आहेत. अयोध्येत होत असलेल्या सोहळ्याबाबत रामभक्तांमध्ये मोठी उत्सुकता आणि आतुरता आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक तेथे पोहोचत आहेत. त्यांच्या माध्यमातून ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद माझ्यापर्यंत पोहोचेल. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या सोहळ्यानंतर रामललाचे दर्शन सहज, सुलभतेने आणि आरामात घेता येईल. अयोध्येला येण्याचा माझा कार्यक्रम आहे. त्यावेळेस श्रद्धापूर्वक रामलला दर्शन करेन. तोपर्यंत राम मंदिराचे कामही पूर्ण झाले असेल. आपल्या स्नेहपूर्ण निमंत्रणाबाबत पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. या सोहळ्यासाठी माझ्या शुभेच्छांचा स्वीकार करावा, अशा आशयाचे पत्र शरद पवार यांनी चंपत राय यांना लिहिले आहे. 

Web Title: Prakash Ambedkar rejected invitation for the inauguration of Ram Mandir in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.