डिटेन्शन सेंटरमध्ये जायचं नसेल तर हे सरकार पाडा- आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 02:44 PM2019-12-26T14:44:33+5:302019-12-26T15:01:36+5:30
एनआरसीच्या मुद्द्यावरुन आंबेडकरांची मोदी-शहांवर टीका
मुंबई: काही लोकांचा मताधिकार काढून घेण्यासाठी मोदी सरकारला राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) लागू करायची आहे, असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. काहींचं नागरिकत्व रद्द करुन त्यांचा मताधिकार काढून घेण्यासाठी मोदी सरकारनं एनआरसीचा कट रचला आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले. आज भारिप बहुजन महासंघाकडून मुंबईत राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलन करण्यात आलं. आंबेडकरांच्या भाषणानं आंदोलनाची सांगता झाली. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचा समाचार घेतला.
आपण या देशाचे नागरिक आहोत, हे सिद्ध करण्यासाठी सरकार आपल्याकडे कागदपत्रं मागणार आहे. आपल्या आजोबा-पणजोबांची माहिती मागितली जाणार आहे. इतकी जुनी माहिती आम्ही कुठून देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशात अराजकता माजवण्यासाठी एनआरसीचा घाट घातला जात आहे. देशातील काहींचा मताधिकार सरकारला काढून घ्यायचा आहे. त्यासाठी सरकारला त्यांचं नागरिकत्व रद्द करायचं आहे. यामुळेच सरकारला एनआरसी लागू करायचा आहे, असा आरोप त्यांनी केला.
एनआरसीचा फटका केवळ मुस्लिमांना बसणार नाही. तो हिंदूंनादेखील बसेल, असं आंबेडकर म्हणाले. चाळीस टक्के हिंदूंना एनआरसीमुळे त्रास सहन करावा लागेल. तुम्ही कादगपत्रं दिली नाहीत, तर तुम्हाला डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. जर तुम्हाला डिटेन्शन सेंटरमध्ये जायचं नसेल तर हे सरकार पाडा, असं आवाहन त्यांनी केलं. मोदी सरकारच्या एनआरसीला आपल्याला संघर्षानं उत्तर द्यावे लागले, असं आंबेडकर यांनी म्हटलं.