काही लोकांचा मताधिकार काढून घेण्यासाठीच एनआरसीचा घाट घातला जातोय; आंबेडकरांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 10:51 AM2019-12-26T10:51:51+5:302019-12-26T12:58:39+5:30

एनआरसीवरुन प्रकाश आंबेडकरांचा मोदी-शहांवर हल्लाबोल

prakash ambedkar slams pm narendra modi and amit shah over nrc caa | काही लोकांचा मताधिकार काढून घेण्यासाठीच एनआरसीचा घाट घातला जातोय; आंबेडकरांचा गंभीर आरोप

काही लोकांचा मताधिकार काढून घेण्यासाठीच एनआरसीचा घाट घातला जातोय; आंबेडकरांचा गंभीर आरोप

googlenewsNext

मुंबई: राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या परस्परविरोधी विधानांवरुन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी देशभरात लागू करणार नाही असं पंतप्रधान जनसभेला संबोधित करताना म्हणतात, मग त्यांचेच गृहमंत्री लोकसभेत एनसीआर लागू करणार असल्याची घोषणा कशी काय करतात, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला. भाजपा आणि संघाचं राजकारण खोटारडेपणावर चालत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) देशावरील संकटं असल्याचा आंबेडकर यांनी म्हटलं. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा एनआरसीवरुन खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. एनआरसीबद्दल मंत्रिमंडळात, संसदेत कधीच चर्चाच झाली नसल्याचं मोदी भरसभेत सांगतात. मग अमित शहा लोकसभेत एनआरसी लागू करणार असल्याची घोषणा कशी काय करतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एनआरसी, सीएएबद्दलची आमची भूमिका मुस्लिमकेंद्री नसून भारतकेंद्री असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

एनआरसीचा फटका केवळ मुस्लिमांना बसणार नाही. तो हिंदूंनादेखील बसेल, असं म्हणत आंबेडकर यांनी आसाममध्ये राबवण्यात आलेल्या एनआरसीचं उदाहरण दिलं. आसाममध्ये करण्यात आलेल्या एनआरसीमध्ये १९ लाख लोक घुसखोर ठरले. त्यातले १४ ते १५ लाख हिंदू आहेत. त्यामुळे एनआरसीचा फटका हिंदूंनादेखील बसणार हे उघड आहे, असं आंबेडकर म्हणाले. 

मोदी सरकारला काही लोकांना बाद करायचं असल्यानंच एनआरसीचा घाट घालण्यात येत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. 'काही लोकांना डिटेन्शन सेंटरमधून पाठवून त्यांचा मताधिकार काढून घ्यायचा आहे. हाच सरकारचा एनआरसीमागचा हेतू आहे. संघाची, भाजपाची विचारसरणी रुजवण्यासाठी हा सगळा खटाटोप केला जात आहे,' असं आंबेडकर यांनी सांगितलं. 
 

Web Title: prakash ambedkar slams pm narendra modi and amit shah over nrc caa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.