स्वत:ला राजे समजणाऱ्यांना जनतेने घरी बसवावं; 'त्या' घटनेवर प्रकाश आंबेडकर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 04:15 PM2024-02-03T16:15:28+5:302024-02-03T16:16:08+5:30

लोकशाहीत मर्यादेत राहून निवडून आलेल्या आमदाराने स्वत:वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Prakash Ambedkar statement over the Ulhasnagar incident, people's representatives need to control themselves | स्वत:ला राजे समजणाऱ्यांना जनतेने घरी बसवावं; 'त्या' घटनेवर प्रकाश आंबेडकर संतापले

स्वत:ला राजे समजणाऱ्यांना जनतेने घरी बसवावं; 'त्या' घटनेवर प्रकाश आंबेडकर संतापले

बीड - उल्हासनगरची घटना दुर्दैवी आहे. राजकारणाची पातळी पूर्णपणे घसरली आहे. जिथे मसल पॉवर नव्हतं, तिथे मसल पॉवर यायला लागले, सत्ता हा पैसा असेच जोडले. या घटनेचा सर्वांनी निषेध करायला पाहिजे. तुमचे लोकशाहीत कितीही मतभेद असले तरी तुम्ही राजे नाही. तुम्हाला लोक राजे बनवतात. तेव्हा लोकशाहीत मर्यादेत राहून निवडून आलेल्या आमदाराने स्वत:वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. असे स्वत:ला राजे समजायला लागलेत अशांना घरी बसवावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले. 

बीड येथे पत्रकारांशी प्रकाश आंबेडकरांनी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, एक-दोन घटनेवरून गृहमंत्री अपयशी झालेत की पूर्ण यंत्रणा कोलमडली आहे हा प्रश्न आहे. प्रत्येकवेळी घटना घडली त्यानंतर राजीनामा द्यावा अशी मागणी होते. परंतु ती घटना घडणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यानंतरही अशा घटना घडल्या तर ते अपयशी ठरतायेत असं म्हणता येईल असं त्यांनी सांगितले. 

तर बीड येथे संताचा कार्यक्रम आहोत. त्यामुळे कुणी ना कुणी येणारच. भाजपाकडून देवेंद्र फडणवीस येतायेत. त्याच्यामुळे आम्ही एकत्र आलोय हे बोलणं अर्थ नाही. या घटनेतून फार अर्थ काढण्याची गरज नाही. मला जे काही करायचे ते उघड करत असतो. मला भाजपासोबत जायचं असं आमच्या पक्षाने ठरवले तर थांबवणार कोण?. पण मागच्या दाराने, पडद्यामागे, टेबलाखाली असं राजकारण करत नाही. जे आहे ते लोकांसमोर, पारदर्शकतेने करतो. म्हणून वंचित बहुजन आघाडीवर लोकांचा विश्वास आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. 

जागावाटपाआधी भूमिका स्पष्ट होणं गरजेचे

महाविकास आघाडीत नव्याने चर्चेला सुरुवात झाली. त्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका काय आहे ते समजावून घेणे गरजेचे आहे. मराठा आंदोलन, ओबीसी आरक्षण आणि शेतकरी यांच्यासह २५ मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. जागावाटपाच्या अगोदर आपल्या पक्षांची भूमिका कळायला हवी. आपण किती मुद्द्यांवर एकत्र आहोत, वेगळे आहोत त्यातून पुढे कसं जायचे हे बैठकीत ठरले. त्यानंतर या मुद्द्यांवर प्रत्येक पक्ष चर्चा करून पुढील बैठकीत विचार होईल. एक एक टप्प्याने पुढे गेलो तर आपल्याला मार्ग काढता येईल अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली. 

मराठा आरक्षणावर शिंदे समितीच्या रिपोर्टनंतर निर्णय

सरकारने कुणबी समुहाच्याबाबतीत अधिसूचना काढली. मराठा आरक्षणाबाबत शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर भूमिका घेणार असं सरकारने म्हटलंय. १६ फेब्रुवारीपर्यंत अधिसूचनेवर हरकती मागितल्या आहेत. लाखो हरकती आल्यानंतर ते सरकार ऐकणार कधी हा प्रश्न आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंच्या आंदोलनावर म्हटलं. 

Web Title: Prakash Ambedkar statement over the Ulhasnagar incident, people's representatives need to control themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.