आमच्या शांततेला आमची कमजोरी समजू नका; वंचित बहुजन आघाडीचा रोहित पवारांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 03:53 PM2024-08-05T15:53:04+5:302024-08-05T15:53:53+5:30
भाजपाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करू नका, भाजपाविरोधी मते वंचित बहुजन आघाडी खाते असा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यावर वंचित बहुजन आघाडीने जुन्या घटनांचा उजाळा देत शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई - रोहित पवारांनी रोज कॅमेऱ्यासमोर येऊन फालतू बोलायची आणि महाराष्ट्राची दिशाभूल करायची सवय थांबवावी. तुमची बडबड थांबवा. आमच्या शांततेला आमची कमजोरी समजू नका असं सांगत वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना इशारा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीनं ट्विट करून रोहित पवारांवर पलटवार केला आहे.
महाराष्ट्राची फसवणूक आणि खोटे बोलणं थांबवा, तुमच्या आजोबांना त्यांच्या स्वत:च्या इतिहासाबद्दल विचारा. आम्ही आठवण करून द्यावी का असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीनं जुन्या घटनांचा हवाला दिला आहे. १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पुलोद सरकार स्थापन करणाऱ्या तुमच्या आजोबांच्या सरकारला तत्कालीन जनसंघाचाही पाठिंबा होता. जनसंघाचा पुलोद सरकारमध्ये समावेश होता. उत्तमराव पाटील, जयवंतीबेन मेहता हे जनसंघाचे आमदार त्या सरकारमध्ये मंत्री होते. सोनिया गांधींना इटालियन म्हणणारे आणि १९९८ मध्ये भाजपाच्या पावलावर पाऊल ठेवून काँग्रेस पक्ष फोडणारे तुमचे आजोबा होते असं वंचितनं म्हटलं.
त्याशिवाय २०१४ मध्ये तुमच्या आजोबांनी भाजपाची धुरा सांभाळली होती. भाजपाला बाहेरुन पाठिंबा दिला. विसरलात का? गडचिरोलीत आरएसएसला शेकडो एकर जमीन कोणाच्या सरकारने दिली होती? तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं २०१९ मध्ये भाजपासोबत रातोरात महाराष्ट्रात सरकार स्थापन केले होते. २०२३ मध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीशी हातमिळवणी केली होती. इतकेच नाही तर महाविकास आघाडीच्या ज्या १०-१२ आमदारांनी क्रॉस व्होटिंग करून विधान परिषद निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या उमेदवारांना जिंकवले, ते चंद्रावरून आले होते का, त्याबद्दल तुम्ही कॅमेऱ्यासमोर काहीच का बोलत नाही असा संतप्त सवालही वंचितने रोहित पवारांना विचारला आहे.
तुमची बडबड थांबवा‼️ @RRPSpeaks रोज कॅमेऱ्यासमोर येऊन फालतू बोलायची आणि महाराष्ट्राची दिशाभूल करायची ही सवय थांबवा.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) August 5, 2024
आमच्या शांततेला आमची कमजोरी समजू नका.
महाराष्ट्राची फसवणूक आणि खोटे बोलणे थांबवा! तुमच्या आजोबांना त्यांच्या स्वतःच्या इतिहासाबद्दल विचारा.
आम्ही आठवण… pic.twitter.com/lYEhSXRCqu
दरम्यान, जरांगे पाटील हे ओबीसी आरक्षणातूनच मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यावर तुम्ही गप्प का आहेत, तुमचा मूर्खपणा थांबवा. तुमच्या पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे हे जनतेला कॅमेरासमोर येऊन सांगा. महाराष्ट्राची फसवणूक आणि दिशाभूल थांबवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात मारल्या गेलेल्या ३ हजार दलितांच्या रक्ताने तुमच्या आजोबांचे हात माखले आहेत. १९९२-९३ दंगलीतही त्यांचा हात होता त्यामुळे आम्हाला तोंड उघडायला लावू नका असा इशाराही वंचित बहुजन आघाडीनं रोहित पवारांना दिला आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार?
शरद पवारांनी कधीही भेदभावाचं राजकारण केले नाही. त्यांचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्राचा विकासच झालेला आम्ही पाहिलेला आहे. विकास करत असताना केंद्राकडूनही निधी त्यांनी आणला आहे. सर्व समाजाला एकत्रित आणत महाराष्ट्र धर्म म्हणून त्यांनी जे काम केले हे मला माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाने आतापर्यंतच्या निवडणुकीत जी मते खाल्ली ती भाजपाविरोधातलीच मते होती. संविधान टिकवायचं असेल तर भाजपाविरोधात लढावे लागेल. लोकसभेची संधी गेली आता भाजपाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत होणार नाही याची दक्षता संविधानाला मानणाऱ्या पक्षांनी लक्षात घेतले पाहिजे असं रोहित पवारांनी म्हटलं.