प्रकाश आंबेडकर तुम्ही कोणाला साथ देत आहात? सुशीलकुमार शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 12:50 PM2019-09-20T12:50:59+5:302019-09-20T12:51:16+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर धर्मांध शक्तीला विरोध केला व त्यांचा वारसा सांगत असलेले प्रकाश आंबेडकर त्याच शक्तींना मदत होईल, असे राजकारण करत आहेत.
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर धर्मांध शक्तीला विरोध केला व त्यांचा वारसा सांगत असलेले प्रकाश आंबेडकर त्याच शक्तींना मदत होईल, असे राजकारण करत आहेत. तुम्ही कोणाबरोबर आहात याचा विचार करणार आहात की नाही, असा प्रश्न माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही त्यांनी टीका केली.
रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना शिंदे यांच्या हस्ते आंबेडकर-नेहरू मैत्री पुरस्कार देण्यात आला. माजी खासदार, अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, काँग्रेस नेते उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, कार्यक्रमाचे संयोजक राहुल डंबाळे यावेळी उपस्थित होते.
मोदी यांना हुकूमशहा व्हायचे आहे, अशी टीका करून शिंदे म्हणाले, ‘‘३७० कलम हटवून कोणी सरदार पटेल होणार नाही. काश्मिरमधील स्थिती दोन महिने होऊन गेले तरीही तणावपूर्ण आहे. सर्वोच्च न्यायालयाला त्याची दखल घ्यावी लागली. नेहरू यांना पंतप्रधान करा, असे खुद्द पटेल यांनीच सांगितले होते. त्याचे दाखले आहेत. मात्र, ते दडवून नवाच खोटा इतिहास सांगितला जात आहे, असे करून नेहरूंची देशावरची छाप पुसता येणार नाही हे सत्ताधाºयांनी लक्षात घ्यावे.’’
देशातील धर्मांध शक्तींच्या विरोधात लढण्याची गरज असून त्यासाठी दलित चळवळीतील सर्वांनी मतभेद मिटवून एकत्र आले पाहिजे, असे शिंदे म्हणाले. तात्पुरत्या लाभापोटी विचारांना माती देत समाजातीलच काहीजण धर्मांध शक्तींबरोबर जुळवून घेत आहेत, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.आंबेडकरी चळवळ आणि पुरोगामी विचारांची ऊर्जा या पुरस्काराने दिली असून, जातीयवादी आणि धर्मांध शक्तींचा बिमोड करण्याचे बळ मिळाले आहे, अशी भावना बागवे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. मोर्चाच्या अध्यक्षा सुवर्णा डंबाळे यांनी प्रास्ताविक केले.
............
प्रा. कवाडे यांनी देशाच्या धर्मनिरपेक्षतेला आरएसएस-भाजपरूपी ग्रहण लागले आहे, अशी थेट टीका केली. आरक्षणामुळेच समाजातील वंचित घटकांना प्रगतीची संधी मिळते. त्यामुळे ते रद्द करायचे असेल तर आधी त्याची समीक्षा करा असे ते म्हणाले.