प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला; OBC मेळाव्यातून मांडली आरक्षणावर भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 12:05 PM2024-01-08T12:05:14+5:302024-01-08T12:07:11+5:30
अस्तित्वात असलेली जात ही मागासवर्गीय आहे की नाही एवढाच निर्णय राज्य सरकारला देता येतो असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
नांदेड - मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी लावून धरली आहे. मात्र ही मागणी अयोग्य असल्याचं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला. नांदेडच्या ओबीसी मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावली त्याचसोबत ओबीसी नेत्यांच्या भूमिकेला प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबाही दिला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगेंच्या निमित्ताने नवीन नेतृत्व पुढे येत असेल तर त्याचं आपण स्वागत केले पाहिजे. परंतु त्यांना सांगायला हवं, आमच्या ताटात येऊ नको. तुला वेगळं ताट हवं असेल तर आम्ही त्याला मदत करतो. कुठल्याही जातीचा ओबीसीत समावेश करण्याचा अधिकार राज्याला नाही. तो अधिकार केंद्र सरकारला आहे. त्याला संसदेची मान्यता घ्यावी लागते. शासनाला कुणालाही जात देता येत नाही. अस्तित्वात असलेली जात ही मागासवर्गीय आहे की नाही एवढाच निर्णय देता येतो. पण कुठल्यातरी नव्या जातीला जन्म देणे हा शासनाचा अधिकार नाही आणि तो घटनेने त्यांना दिलेला नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मी जरांगे पाटलांनाही समजावून सांगितले आहे. जर तुम्ही राजकारणासाठी करत असाल तर फार चांगले आहे. कारण ही सडलेली नेतृत्व आहेत हे त्यांच्याही समाजाला न्याय देत नाही आणि आमच्याही समाजाला न्याय देत नाही. परंतु जरांगे पाटलांच्या निमित्ताने जर नवीन नेतृत्व पुढे येत असेल त्याला स्वागत केले पाहिजे. वेगळे ताट हवं तर मदत करतो. ओबीसीचे ताट आणि गरीब मराठ्यांचे ताट वेगळे आहे हे लक्षात घ्यावे. जसं SC-ST दोघांना आरक्षण आहे. तसं OBC चं आरक्षण ओबीसींना. जर दोन्ही ताट वेगळे राहिले तर महाराष्ट्रात आपण बदल घडवू शकतो. राज्यात चोरांचे नेतृत्व आहे. ते आपल्याला लुटतात तसं त्यांच्या समाजालाही लुटतात असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
दरम्यान, राज्यात महागाई वाढलेली असताना मोदी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करत आहेत. त्यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येकाच्या खात्यात पाचशे रुपये तरी टाकावेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपला एकाधिकारशाही आणायची असून ती पद्धत लोकशाहीसाठी घातक आहे. संविधानात काय चुकीचे आहे, याबाबत चर्चा करण्यासाठी भाजप पुढे येत नाही. मी मोहन भागवत यांना भेटण्यासाठी वेळ मागितली, परंतु, ते चर्चा करायला देखील तयार नसल्याचे आंबेडकर म्हणाले.