जितेंद्र आव्हाडांच्या पत्राला प्रकाश आंबेडकरांचे पत्राद्वारे उत्तर; काय म्हणाले, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 10:31 PM2024-03-04T22:31:39+5:302024-03-04T22:32:06+5:30
'निवडणूक झाल्यानंतर BJP बरोबर जाणार नाहीत, याची खात्री द्यावी लागेल.'
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावरुन चर्चा सुरू आहे. पण, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. अशातच वंसिचला महाविकास आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज एका पत्राद्वारे प्रकाश आंबेडकरांना भावनिक साद घातली होती. त्यावर आता प्रकाश आंबेडकर यांनीही पत्राद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर हे पत्र शेअर केले. त्यात त्यांनी म्हटले की, "जितेंद्र आव्हाड, आपण लिहिलेले पत्र व्यक्तीगत लिहिले आहे, राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहीलेले नाही, असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की, पक्षाची असो की व्यक्तीगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. आपण या अगोदरही भाजपबरोबर समझोत्यामध्ये होता, आजही समझोत्यामध्ये आहात आणि यापुढे राहाल याबद्दल व्यक्तीगतरित्या खात्री आहे. परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही."
"त्यामुळे संविधान वाचविणे ही जी आपण व्यक्तीगत जबाबदारी घेतलेली आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण आपला पक्ष संविधान वाचविण्यासाठी पुढे येईल का? याबद्दल आमच्या मनात शंका आहे. आपल्या परीने आम्हाला संविधान वाचविण्यासाठी जे आणि जेवढे करणे शक्य आहे, तेवढे आम्ही संविधान वाचविण्यासाठी करत राहणार आहोत. त्यामुळे पत्राद्वारे आपण व्यक्तीगत संदेश पाठवला असला तरी त्यातून एक सूर दिसत आहे की, आम्ही संविधान वाचवायला निघालेलो नाही."
"या पत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे सांगत आहोत की, आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्यावेळी आमच्यातर्फे जेव्हा सांगण्यात आले की, आपल्याला मतदारांना हे आश्वासित करावे लागेल की निवडणुकीनंतर आम्ही बीजेपी किंवा आरएसएसबरोबर समझोता करणार नाही. तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते, ते त्यावर काहीच बोलले नाहीत. ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शविला. आपणच फक्त म्हणालात की, लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे? ज्या शिवसेनेला आपण सोबत घेतले आहे. त्या शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी उघडउघड असे लिहून देण्यास नकार दिलेला आहे."
"या सर्व पार्श्वभूमीवर बघितले तर आम्हाला जर आपल्याबरोबर यायचे असेल, तर आम्हाला खात्री करुन घ्यावी लागेल की, तुम्ही निवडणूक झाल्यानंतर बीजेपीबरोबर जाणार नाहीत, याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल आणि ती व्यक्तीगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल," अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रद्वारे दिली.