प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 04:21 PM2024-10-11T16:21:56+5:302024-10-11T16:22:16+5:30
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
Prakash Ambedkar ( Marathi News ) : “धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षा भूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये, यासाठी मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी केली आहे,” अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी दिनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दिक्षा घेतली हा दिवस जगभरातील अनुयायांसाठी सन्मानाचा मुक्तीचा दिवस आहे. दरवर्षी प्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हा सण साजरा करण्यात येतो, यावर्षी १२ ते १३ ऑक्टोबर दरम्यान दिक्षा भूमी नागपूर, बौद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायी हा सण साजरा करण्यासाठी प्रवास करत असतात. एवढ्या मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सण असताना त्यांच्याकडून टोल वसूल केला जातो. महाराष्ट्र आणि देशभरातील ग्रामीण भागातून लोक येथे तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करत असतात. मी वंचित बहुजन आघाडीकडून मागणी करतो की, आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी आकारण्यात येणारा टोल माफ करावा, कृपया आपण त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा," अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या मागणीला मुख्यमंत्री शिंदे कसा प्रतिसाद देतात आणि बौद्ध बांधवांसाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनी टोलमाफीचा निर्णय घेतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.