भिडेंना आठ दिवसांत अटक करा!, सरकारला प्रकाश आंबेडकरांचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 06:09 AM2018-03-27T06:09:35+5:302018-03-27T06:09:35+5:30

कोरेगाव भीमा प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना येत्या ८ दिवसांत अटक करा, नाहीतर

Prakash Ambedkar's ultimatum to arrest Bhatenna in eight days! | भिडेंना आठ दिवसांत अटक करा!, सरकारला प्रकाश आंबेडकरांचा अल्टिमेटम

भिडेंना आठ दिवसांत अटक करा!, सरकारला प्रकाश आंबेडकरांचा अल्टिमेटम

googlenewsNext

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना येत्या ८ दिवसांत अटक करा, नाहीतर विधान भवनाला घेराव घालू, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आझाद मैदानात सोमवारी काढलेल्या एल्गार मोर्चात आंबेडकर बोलत होते. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करत सडकून टीकाही केली.
कोरेगाव भीमा प्रकरणाला तीन महिने पूर्ण होत असून अटक करण्याऐवजी संभाजी भिडे यांना मोदी सरकार पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी या वेळी केला. ते म्हणाले की, पुरावे दिल्यानंतर या प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने त्यांना दंगलखोर ठरवल्यानंतर सरकारने कारवाई केली. तोपर्यंत पुरावे नसल्याचे कारण देत सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. मुळात एकाच गुन्ह्यातील दोन आरोपींपैकी एकाला अटक होते, तर दुसरा मोकाट फिरतो. यावरूनच मोदी सरकार भिडे यांना पाठीशी घालत असल्याचे दिसते. त्यामुळे आठ दिवसांची मुदत सरकारला देऊन आज जात आहोत. मात्र पुन्हा आल्यास, जे हवे ते घेतल्याशिवाय परत जाणार नाही. त्या वेळी माझी दादागिरी चालेल. मग विधानसभेला घेराव घालू. त्यासाठी आंदोलनकर्त्यांना १० दिवसांची भाकर घेऊन येण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोदींवर एकेरी टीका करताना आंबेडकर यांनी त्यांची तुलना हिटलरशी केली. हिटलर मनमानी करत होता, म्हणून त्याला सत्ता गेल्यावर स्वत:वर गोळ्या घालून ठार करण्याची वेळ आली. मोदीही मंत्र्यांना कैद्यांप्रमाणे वागवत असून मनमानी करत आहेत. त्यामुळेच रावसाहेब दानवे यांना अवघ्या दीड महिन्यात मंत्रीपद सोडावे लागले. मात्र आमच्या नादाला लागू नका. नाही तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची गाडलेली भुते बाहेर काढू. त्यामुळे मुकाट्याने भिडे यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली.
या मोर्चाला राज्यभरातून प्रतिसाद देत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिले होते.
...तर तुमची प्रकरणे बाहेर काढू!
गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे. भिडेंसोबतचा फोटो सोशल मीडियावर टाकून नरेंद्र मोदींना काय संदेश द्यायचा आहे, ते समजते. आमच्या नादाला लागू नका, नाही तर तुमची प्रकरणे बाहेर काढू, असा इशारा आंबेडकर यांनी दिला.

रखवालदाराकडून रखवालदारी काढून घ्या!
मुख्यमंत्र्यांना फेसबुकवरून मारण्याची धमकी देणाऱ्या रावसाहेब पाटीलला पोलीस अटक का करत नाहीत, असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला. त्या आक्षेपार्ह पोस्टबाबत पोलिसांची भूमिका पाहून ते झोपलेले आहेत, असेच दिसत असल्याची टीका आंबेडकरांनी केली. म्हणूनच रखवालदाराकडून रखवालदारी काढून घेण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले.

आधारकार्ड म्हणजे मारण्याचा परवाना!
प्रत्येक गोष्टीसाठी आधारकार्ड कशाला लागते, असा सवाल उपस्थित करत आधारकार्ड म्हणजे मारण्याचा परवाना असल्याचे आंबेडकर म्हणाले. नरेंद्र मोदींना देशातील ५० टक्के लोकांना ब्लॅकमेल करायचे आहे. म्हणूनच सरकार लोकांची खासगी माहिती गोळा करत आहे. मात्र मला माझे स्वातंत्र्य अबाधित राखायचे असून तुम्हालाही राखायचे असेल, तर दीर्घकाळ लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘आम्हाला मारले जात असून मोर्चा काढायलाही परवानगी नाकारली जात आहे. जणूकाही देशात यादवीच आल्याचे चित्र आहे. मात्र अद्याप ठोकशाहीने लोकशाहीची जागा घेतलेली नाही.
लोकांच्या मनातील चीड, राग आणि उद्रेक लक्षात घ्या. देशात राजेशाही आलेली नाही. म्हणूनच देशातील लोकशाही टिकवायची असेल, तर सरकार हटवा’, अशी घोषणाच आंबेडकर यांनी व्यासपीठावरून दिली.

पुरावे तपासून कारवाई!
कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये संभाजी भिडेंचा थेट सहभाग आतापर्यंत झालेल्या तपासात आढळलेला नाही. आम्ही अजूनही तपास करत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितल्याची माहिती सूत्रांकडून कळाली आहे.
भिडेंचे या प्रकरणात हात असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा आंबेडकर यांनी चर्चेदरम्यान केला. त्यावर प्रत्येक पुरावा सरकार तपासेल आणि त्यात भिडेंचा संबंध आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

Web Title: Prakash Ambedkar's ultimatum to arrest Bhatenna in eight days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.