संभाजी भिडेंना अटक झाली नाही, तर विधानसभेला घेराव घालू - प्रकाश आंबेडकर यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 05:38 PM2018-03-26T17:38:36+5:302018-03-26T18:05:17+5:30
संभाजी भिडे यांना अटक झाली नाही तर विधानसभेला घेराव घालणार. पुन्हा यायला लावू नका, पुन्हा आलो तर जे हवे ते मिळाल्याशिवाय पुन्हा जाणार नाही.
मुंबई - संभाजी भिडे यांना अटक झाली नाही तर विधानसभेला घेराव घालणार. पुन्हा यायला लावू नका, पुन्हा आलो तर जे हवे ते मिळाल्याशिवाय पुन्हा जाणार नाही. आज याठिकाणी इशारा देऊन थांबतोय, पुढच्या वेळी येणार त्यावेळी माझी दादागिरी चालेल असा इशारा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एल्गार मार्चचा समारोप करताना दिला.
भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करत सोमवारी मुंबईत एल्गार मार्च काढणाऱ्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनाच्या समारोपप्रसंगी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. "भीमा-कोरेगाव दंगलीला तीन महिने पूर्ण होत आले आहेत, पण आंदोलकांवर कारवाई झालेली नाही. दंगलीत सहभाग असल्याचे पुरावे दिल्यानंतर एकबोटे याने कोर्टात धाव घेतली. मात्र कोर्टानेही त्याला दंगलखोर ठरवले. त्यानंतर अखेरीस सरकारने त्याला अटक केली."
संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांचा खून करण्याचा संदेश दिला होता, असा सनसनाटी आरोपही आंबेडकरांनी केला,"मुख्यमंत्र्यांचा खून करा, असा संदेश भिडेंनी रावसाहेबांना दिला होता. पोलीस प्रशासन मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्यानंतर वाचवू शकत नाहीत. पोलीस शांत झोपून आहेत. फेसबुकवरून धमकी देणाऱ्याला पाच मिनिटे पोलीस ठाण्यात बोलावले जात नाही. भिडे गुरुजी तुमचे आहेत, आम्हाला त्यांची गरत नाही." असे ते म्हणाले.
"आम्ही मेलेले मु़डदे मसणातून बाहेर काढू शकतो. मसणजोगी आमच्यासोबत आहेत. ही भुते बाहेर काढायची नसतील तर मुकाट्याने भिडेंना अटक करा. जाताना इशारा देतोय, पुन्हा यायला लावू नका. पुन्हा आलो , तर जे हवे ते मिळाल्याशिवाय पुन्हा जाणार नाही. एक खूणगाठ बांधली पाहिजे, संघटनेचा कार्यकर्ता सांगेल तेच खरे मानले पाहिजे.आज याठिकाणी इशारा देऊन थांबतोय, पुढच्या वेळी येणार त्यावेळी माझी दादागिरी चालेल. भिडेला अटक झाली नाही, तर विधानसभेला घेराव घातल्याशिवाय जाणार नाही, असा इशाराही त्यांनी अखेरीस दिला.