Maharashtra CM: शिवसेनेने निवडलेला मार्ग विश्वासघाताचा होता: प्रकाश जावडेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 04:22 PM2019-11-23T16:22:36+5:302019-11-23T16:27:31+5:30
शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले तर चालते मात्र त्याच राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत आल्यास ते चुकीचे असल्याचे कसे म्हणता येईल असेही जावडेकर म्हणाले.
मुंबई : अजित पवार यांनी रात्री उशिरा भाजपासोबत हातमिळवणी करुन सत्तेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत ८ आमदार शपथविधीला उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना शपथ दिली. त्यांनतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहे. महाशिवआघडीचे सरकार बनवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडलेला मार्ग विश्वासघाताचा होता, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जावडेकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले असून त्यांचे मी स्वागत करतो.गेल्याकाही दिवसांपासून राज्यात ज्या राजकीय घडमोडी घडत होत्या,त्याला आज पूर्णविराम मिळाले आहे. कारण शिवसनेने स्त्तास्थापेनेसाठी जो मार्ग निवडला होता तो विश्वासघाताचा मार्ग असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला आहे.
जनतेनी भाजप आणि महायुतीला मतदान केले होते. मात्र महायुतीचे मते घेऊन त्यांनाच विरोध करून काँग्रेससोबत जाण्याचे पाप शिवसेना करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे आजच्या घडामोडी महत्वाच्या ठरत आहे. ज्या काँग्रेसने देशात आणीबाणी लावली, देश लुटला अशा पक्षासोबत शिवसेना जाणार होती, अशी टीका जावडेकर यांनी केली आहे.
तसेच निवडणुकीत शिवसनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मते मागीतीली मात्र सत्तेसाठी ते काँग्रेससोबत जाणार होते. तसेच शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले तर चालते मात्र त्याच राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत आल्यास ते चुकीचे असल्याचे कसे म्हणता येईल असेही जावडेकर म्हणाले.