‘स्वच्छ कॅम्पस, स्मार्ट कॅम्पस’ स्पर्धेचं आयोजन करणार : प्रकाश जावडेकर
By admin | Published: June 5, 2017 06:52 PM2017-06-05T18:52:26+5:302017-06-05T18:52:26+5:30
स्वच्छ भारत मोहिमेच्या धर्तीवर देशातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांसाठी ‘स्वच्छ कॅम्पस, स्मार्ट कॅम्पस’ या स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 5 - स्वच्छ भारत मोहिमेच्या धर्तीवर देशातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांसाठी ‘स्वच्छ कॅम्पस, स्मार्ट कॅम्पस’ या स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केली. सर्व शैक्षणिक संस्थांसाठी ही स्पर्धा खुली राहणार असून जानेवारी महिन्यात सर्वेक्षण करून फेब्रुवारीमध्ये विजेत्या संस्थांना पुरस्कार दिले जातील, असे जावडेकर यांनी सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनी कोथरूड येथील डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कॅम्पस येथे स्मार्ट कॅम्पस क्लाऊड नेटवर्क (एससीसीएन)च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, टेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र शेंडे, एमआयटीचे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, एमआयटी एडीटीचे उपाध्यक्ष डॉ.मंगेश कराड, प्राचार्य डॉ.जय गोरे, प्रा. प्रकाश जोशी व डॉ.मिलिंद पांडे उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, पाणी व उर्जा बचत, कचºयाचे व्यवस्थापन चांगल्यापध्दतीने करणे हे आपल्या जीवनशैलीचा भाग बनायला हवा. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील कामातूनच हे धडे मिळावे, हा ‘स्वच्छ कॅम्पस, स्मार्ट कॅम्पस’ हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. देशातील ८०० विद्यापीठे व सुमारे ४० हजार महाविद्यालयांसाठी ही स्पर्धा खुल असेल. सर्व शैक्षणिक संस्थांनी आपला कॅम्पस स्वच्छ करून स्वच्छ भारत मोहिमेचा भाग व्हावे, ही अपेक्षा आहे. त्यामध्ये पाणी, उर्जा बचत, कचºयाचे व्यवस्थापन हे महत्वाचे मुद्दे आहेत. यामध्ये उत्कृष्ट काम करणाºया संस्थांना स्मार्ट कॅम्पस घोषित करून पुरस्कार दिले जातील. जानेवारीमध्ये संस्थांचे परीक्षण करून फेब्रुवारीमध्ये पुरस्कार दिले जातील. युजीसी, एआयसीटीमार्फत स्पर्धेच्या नियम-अटी तयार केल्या जातील. अनेक शाळांमध्ये हे काम चांगले सुरू आहे. त्यामुळे ही स्पर्धा एक वर्षानंतर शाळा स्तरावरही आयोजित करण्याचे नियोजन आहे.
पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय चर्चेपासून पुर्वी भारत दुर असायचा. प्रत्येक गोष्टीला विरोध करणारा देश, असे संबोधले जायचे. पण आम्हीी हे चित्र बदलले. पर्यावरणाच्या रक्षणामुळे शाश्वत जीवनाची हमी मिळेल. यासाठी भारताने खुप काम केले आहे. प्रत्येक राज्यात वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापनातही आघाडी घेतली आहे, असे जावडेकर म्हणाले.
कॅम्पस क्लाऊड नेटवर्क हा प्रकल्प म्हणजे विज्ञान, अध्यात्म आणि शाश्वत विकास यांचे एकत्रीकरण असून त्यामुळे उज्वल भविष्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल पडेल, असे डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले.
भटकलेले सुधारतील-
पर्यावररविषयक पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडला आहे. याविषयी बोलताना अमेरिकेचे नाव न घेता प्रकाश जावडेकर यांनी ‘जे भटकले आहेत ते सुधारतील’असा टोला लगावला. ते म्हणाले, या करारावर भारत ठाम आहे. पर्यावरणाचे संरक्षण हे भारतातील लोकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहे. हा श्रध्देचा विषय आहे. पर्यावरणाच्या रक्षणातूनच जगाचे भले होणार आहे. त्यामुळे जे भटकले आहेत ते सुधारतील. भारत आपल्या मार्गाने चालत राहील.