प्रकाश मेहतांमुळे सरकारची कोंडी, विरोधक झाले आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:44 AM2017-08-03T00:44:10+5:302017-08-03T00:44:43+5:30
गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ
अतुल कुलकर्णी ।
मुंबई : गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असेही त्यांनी विधानसभेत जाहीर केले. मात्र, कोणत्या प्रकारची चौकशी समिती नेमली जाणार, त्याची कार्यकक्षा काय असणार, ती चौकशी कोण करणार याविषयी कोणतीही स्पष्ट भूमिका सरकारने जाहीर केली नाही. मेहतांवर कारवाई केली तर एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार यांच्यावरही कारवाई करावी लागेल आणि कारवाई केली नाही तर विरोधक याचे मोठे भांडवल करतील, या दुविधेत सरकार अडकले आहे.
दरम्यान, प्रकाश मेहता यांनी, आपल्याच पक्षातील काही छुप्या हितशत्रूंनी आपल्या बदनामीचे कारस्थान रचल्याचा गंभीर आक्षेप घेतल्यामुळे या सगळ्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. भाजपामध्ये या विषयाची वेगळीच स्टोरी सांगितली जाते. मेहता आणि पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मात्र, मेहता आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध म्हणावे तेवढे चांगले नाहीत. एस.डी. कॉर्पोरेशनचे काम मार्गी लागावे, यासाठी शहा यांनी मुख्यमंत्र्यांना विचारुन निर्णय घ्या, असे मेहतांना सांगितले होते; पण मेहता यांनी तसे न करता ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केले’ असे फाइलवर लिहून स्वत:च निर्णय घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री संतप्त झाले अशी माहिती भाजपाचे काही नेते खासगीत सांगतात. अमित शहा यांचे नाव या सगळ्या प्रकारामागे आल्यामुळे आणि हा निर्णय अमलात आला असता, तर होणारा आर्थिक लाभ हा ५०० ते ७०० कोटींचा असल्याचे मांडले गेल्याने या विषयाचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळेच मेहता यांचे पक्षांतर्गत हितशत्रू कोण? मेहता यांचा रोख कोणाच्या दिशेने आहे, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. विरोधकांनाही या प्रकरणी एवढ्या उशिरा जाग येण्याचे कारण काय? असाही एक सूर यावरील चर्चेत आहे.
मेहता यांच्यावतीने एक ई-मेल माध्यमांना खुलासा म्हणून पाठवला गेला. सभागृह चालू असताना मंत्री सभागृहाबाहेर कसे निवेदन देतात, स्वपक्षीयावर गंभीर आक्षेप कसे घेतात, असे प्रश्न
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केल्यानंतर आपण असे निवेदन केलेच नाही, असे घुमजाव मेहता यांनी केले.
मात्र, जर मेहता यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी हे निवेदन स्वत:च्या सहीने करावे, ते जर हे निवेदन नाकारत असतील तर त्या निवेदनातील सर्व महत्त्वपूर्ण माहिती तिसºयाच माणसाला कशी काय मिळते, निवेदनात मेहतांच्या नावापुढे माननीय वगैरे शब्दप्रयोग कसे येतात? हे सगळे संशयास्पद असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दबाव टाकल्यामुळेच मेहता यांनी हे निवेदन मागे घेतले असावे, असे चव्हाण ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
अतिरिक्त मुख्य सचिवांना कळत नाही का?
गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी एस.डी. कॉर्पोरेशनबाबत असा निर्णय घेणे अयोग्य असल्याचे पानभर नोटिंग केलेले असताना ते खोटे ठरवून मेहता यांनी हा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाºयाला काही कळत नाही का? तसे असेल तर त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल आणि जर संजयकुमार यांचे बरोबर असेल तर मेहतांवर कारवाई करावीच लागेल.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
मेहता यांनी हे प्रकरण अधिवेशनात येऊ नये यासाठी प्रचंड प्रयत्न केले; पण त्यात त्यांना यश आले नाही. त्याच वेळी राधेश्याम मोपलवार यांचे प्रकरण निघाल्याने हे दोन्ही विषय आणखीनच अडचणीचे बनले. मोपलवार यांच्यावर कारवाई केली तर मेहतांवर का नाही, असा सवाल विरोधक करतील त्यामुळे सरकारची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे.