सभा उधळण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर देऊ; OBC नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 04:00 PM2023-11-25T16:00:38+5:302023-11-25T16:01:31+5:30
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा हिंगोलीत होईल असं शेंडगेंनी म्हटलं.
हिंगोली - ओबीसी समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्हाला कुणबी दाखले द्या, ओबीसीत समावेश करा या मागणीला विरोध करण्यासाठी हिंगोलीत सभा होतेय. हा गरीब समाज एकत्रित येऊन आमचे ताट कुणी हिसकावून घेऊ नये अशी भूमिका मांडतोय. ही सभा कुणी उधळून लावण्याची भाषा करत असेल तर महाराष्ट्रात हे खपवून घेतले जाणार नाही. जे ही सभा उधळण्याचा प्रयत्न करतील त्यांना ओबीसी कार्यकर्ते जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा प्रतिइशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले की,ज्या लोकांनी ही सभा उधळण्याचा इशारा दिलाय त्यांचा प्रशासनाने आणि सरकारने बंदोबस्त करावा. नाहीतर ओबीसी कार्यकर्ते त्यांचा बंदोबस्त करतील. मराठा आंदोलकाच्या घरी काडतूस सापडतात हे महाराष्ट्रात काय चाललंय? आंदोलन शांततेत सुरू आहे अशा वल्गना होत आहे. परंतु हे विदारक चित्र समोर येत आहे. हे सामाजिक आंदोलन आहे ते पिस्तुल, काठ्या कुऱ्हाडी घेऊन आंदोलन होणार असेल तर महाराष्ट्राचे भवितव्य ठीक दिसत नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा हिंगोलीत होईल. मराठवाड्यातून सर्व बांधव घराला टाळे लावून इथं उपस्थित राहील. अंबडपेक्षाही मोठी सभा होईल. सर्व पक्षाचे नेते पक्षीय मतभेद बाजूला ठेवून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही या भूमिकेतून एकत्र येणार आहेत. मराठ्यांना ५० टक्क्यांच्यावर वेगळे आरक्षण द्यावे अशी आमची भूमिका आहे. या सभेला छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, मंत्री संजय राठोड यांच्यासह इतर समाजातील नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिली.
दरम्यान, मराठा समाजाचे मागासलेलेपण किती वेळा तपासणार आहे? राज्य मागासवर्गीय आयोग सरकारच्या हातातील बाहुले बनत असेल तर आमचा त्यांना विरोध आहे. महाराष्ट्रात हिंगोलीतील सभा आगळीवेगळी असेल. या सभेनंतर राज्यातील सामाजिक आणि राजकीय चित्र बदलेल असा विश्वास प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केला.