Maharashtra Politics: प्रमोद महाजनांनी शिवसेनेविषयी केलेले ‘ते’ भाकित खरे ठरले! म्हणाले होते, “बाळासाहेबांनंतर...”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 04:47 PM2023-02-18T16:47:11+5:302023-02-18T16:47:59+5:30
Maharashtra News: प्रमोद महाजन नेमके काय म्हणाले होते?
Maharashtra Politics: गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यानंतर ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच प्रमोद महाजन यांनी शिवसेनाबाबत केलेल्या एका भविष्यवाणीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.
बाळासाहेब ठाकरे हयात असताना भाजप आणि शिवसेनेची महाराष्ट्रात युती झाली. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांना युतीचे शिल्पकार मानले जात होते. मात्र २०१४ ला पहिल्यांदा युती तुटली. त्यानंतर आता प्रमोद महाजन यांच्या त्या वक्तव्याची चर्चा होते आहे. राजदीप सरदेसाई यांनी २० वर्षांपूर्वी प्रमोद महाजन यांना शिवसेना आणि भाजपबाबत एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना प्रमोद महाजन यांनी एक भाकीत केले होते. तेच भाकित खरे ठरले, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत राजदीप सरदेसाई यांनी ही आठवण सांगितली.
प्रमोद महाजन यांनी केलेले भाकित खरे ठरले
देशात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. त्या काळात मुंबईचे शेरीफ नाना चुडासमा होते. त्यांच्या घरी एक पार्टी होती. प्रमोद हे मंत्रिमंडळातील मोठे नाव होते. त्या पार्टीत प्रमोद महाजन यांना विचारले की, दिल्लीत तुम्ही क्रमांक एकचा पक्ष आहात आणि वाजपेयींच्या नेतृत्त्वात निवडणुका लढवत आहात पण महाराष्ट्रात तुम्ही लहान भाऊ आहात. तुमचा मोठा भाऊ तर महाराष्ट्रात शिवसेना आहे. त्यावर प्रमोद महाजन म्हणाले की, जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात लहान भाऊ आहोत. ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरे नसतील त्यानंतर हिंदुत्वाच्या या युतीत भाजप क्रमांक एकचा पक्ष होईल आणि शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष असेल. दरम्यान, गेल्या आठ वर्षात भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे प्रमोद महाजन यांनी केलेले भाकित खरे ठरले आहे, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"