प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये सापडूनही सुदैवाने वाचले प्राण
By admin | Published: September 7, 2016 01:45 PM2016-09-07T13:45:18+5:302016-09-07T13:45:18+5:30
धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात पाय घसरुन एक ५० वर्षांचा माणूस ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये सापडला होता.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात पाय घसरुन एक ५० वर्षांचा माणूस ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये सापडला होता. केवळ दैव बलवत्तर असल्याने या माणसाचे प्राण वाचले. अजय उपाध्याय असे या सुदैवी व्यक्तीचे नाव असून, शनिवारी संध्याकाळी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ही घटना घडली.
अजय आणि त्यांचे तीन मित्र धावती राजधानी एक्सप्रेस पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचे तीन मित्र डब्ब्यात प्रवेश करण्यात यशस्वी ठरले पण अजय यांचा पाय घसरला व ते ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये सापडले. त्यांनी डब्ब्याच्या हॅण्डलला घट्ट पकडून ठेवल्यामुळे ते बचावले. ही घटना पाहणा-या प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरडा केल्यामुळे एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने तात्काळ ट्रेन थांबवली.
सुदैवाने अजय यांना या दुर्घटनेत गंभीर दुखापत झाली नाही. त्यांच्या शरीरावर काही ठिकाणी जखमा झाल्या आहेत. त्यांना तात्काळ जवळच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मुंबईमध्ये दररोज धावती लोकल ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असे अपघात होत असतात. ज्यात ट्रेनखाली येऊन अनेकांचा मृत्यू होतो. अजय यांचे नशीब बलवत्तर असल्याने ते सुदैवाने बचावले. अजय आणि त्यांचे तीन सहकारी पुण्यात एका बिझनेस सेमिनारसाठी आले होते. राजधानीने घरी परतत असताना ही दुर्घटना घडली.