प्रसादला व्हायचंय आयएएस!; पहिल्याच प्रयत्नात उपजिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 03:12 AM2020-06-20T03:12:10+5:302020-06-20T03:12:24+5:30
पहिल्याच प्रयत्नात ५८८ गुण मिळवून संपूर्ण राज्यात पहिला येण्याचा बहुमान मिळविल्याने सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
सातारा : केंद्रीय सेवा परीक्षेतून (यूपीएससी) आयएएस होण्याची इच्छा उपजिल्हाधिकारी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या कºहाडच्या प्रसाद चौगुले याने व्यक्त केली आहे.
पहिल्याच प्रयत्नात ५८८ गुण मिळवून संपूर्ण राज्यात पहिला येण्याचा बहुमान मिळविल्याने त्याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साताऱ्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शिकत असताना अनेक प्रशासकीय अधिकारी शाळेत येऊन मार्गदर्शन करायचे. या विद्यालयातच स्पर्धा परीक्षेचा पाया मजबूत झाला. आपणही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जावे, ही तेव्हापासूनच इच्छा होती. ती आज पूर्ण झाल्याचे समाधान वाटते, असेही त्याने सांगितले.
प्रसाद चौगुले याचे प्राथमिक शिक्षण खावली (ता. सातारा) येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. कºहाड येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमधून त्याने अकरावी व बारावी पूर्ण केली. बारावीच्या परीक्षेत त्याला ८८ टक्के गुण मिळाले होते. या गुणांच्या बळावर प्रसादला कºहाडमधीलच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला. अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू असतानाच प्रसादची फियाट कंपनीमध्ये अभियंता म्हणून निवड झाली. २०१७ मध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली. पुण्यामध्ये फियाट कंपनीमध्ये नोकरी करतच प्रसादने स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास सुरू केला.
पुण्यातील ज्ञानदीप करिअर अॅकॅडमीचे चांगले मार्गदर्शन लाभल्याचे त्याने सांगितले. तो विद्यानगर (कºहाड) येथे राहण्यास असून वडील महावितरणमध्ये आॅपरेटर आहेत. तर आई गृहिणी आहे. प्रसादच्या दोन बहिणींनी देखील अभियांत्रिकीची पदवी मिळविलेली आहे.
‘आई-वडिलांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दोन बहिणी आणि मला उच्च शिक्षण दिले. त्यांचे स्वप्न पूर्ण केल्याचा अभिमान वाटत आहे,’ अशी भावना प्रसादने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
बारामतीच्या आरती पवारचेही यश
बारामती : येथील २५ वर्षीय आरती पवार यांनी एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत एनटीबी प्रवर्गात मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्या सध्या बारामती नगरपरिषदेत करनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे सर्व शिक्षण शहरातील एमईएस हायस्कूल व विद्या प्रतिष्ठान येथे झाले. दोन वर्षांपासून रोज १० ते १२ तास कसून अभ्यास केल्याने यश मिळाले. अजून मेहनत करून आयएएस होण्याचे स्वप्न असल्याचेही तिने सांगितले. तिचे वडील राजेंद्र पवार हे झारगडवाडी येथे प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. तर आई गृहिणी आहेत.
मोठी झेप घ्यायचीय
वैद्यकीय सेवेपेक्षाही या क्षेत्रातील सेवेचे परीघ मोठे आहे, हे लक्षात आल्यानंतर आपण स्पर्धा परिक्षेकडे वळलो़ यश मिळाले तरी आणखी मोठी झेप घ्यायची आहे, अशी प्रतिक्रिया मागास प्रवर्गातून प्रथम आलेले उस्मानाबादमधील बोर्डा (कळंब) येथील डॉ. रवींद्र शेळके यांनी दिली.
खडतर परिस्थितीवर मात
नांदेड जिल्ह्यातील जोशी सांगवी येथील वसीमा शेख ही खुल्या वर्गातून राज्यात तिसरी आली आहे. आई मजुरीचे काम करते तर दोन भाऊ रिक्षा चालवतात. खडतर परिस्थितीतून मार्ग काढत तिने हे यश मिळवले आहे. सध्या ती नागपुरात राज्य कर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. वृत्तपत्रांमधून येणाºया कर्तबगार शासकीय अधिकाऱ्यांच्या बातम्यांनी मला अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाल्याचेही तिने आवर्जून सांगितले.