प्रसाद लाड यांचा एकतर्फी विजय, काँग्रेस-राष्ट्रवादीची ९ मते फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 04:55 AM2017-12-08T04:55:42+5:302017-12-08T10:40:31+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत सरकारविरोधात हल्लाबोल करण्याची तयारी चालविली असताना विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत या दोन्ही पक्षांना आपले आमदारही सांभाळता आले नाहीत
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत सरकारविरोधात हल्लाबोल करण्याची तयारी चालविली असताना विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत या दोन्ही पक्षांना आपले आमदारही सांभाळता आले नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नऊ मतांवर हल्लाबोल करीत भाजपाचे प्रसाद लाड यांनी एकतर्फी विजय मिळविला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. यात भाजपाचे लाड यांना
२०९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप माने यांना केवळ ७३ मते मिळाली. एकूण २८४ मतदान झाले. त्यातील दोन मते अवैध ठरली. विरोधकांकडे काँग्रेस (४२) आणि राष्ट्रवादी (४१) मिळून एकूण ८३ संख्याबळ होते. सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मतदानाला आले नाहीत. त्यामुळे एक मत आधीच कमी झाले. उर्वरित ८२ पैकी फक्त ७३ मते माने यांना मिळाली. याचाच अर्थ काँग्रेस-राष्ट्रवादीची किमान नऊ मते फुटली.
एमआयएम अनुपस्थित
एमआयएमच्या दोन आमदारांनी मतदानात भाग घेतला नाही. शिवसेनचे नेते, राज्यमंत्री, अर्जुन खोतकर यांची आमदारकी न्यायालयाने रद्द केली असल्याने त्यांना मताधिकार नव्हता.
रमेश कदमांचे मतही लाड यांना
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम यांनी प्रसाद लाड यांना मतदान केले. त्यांनी स्वत:च,आपण राष्ट्रवादी विचाराचे लाड यांना मत दिल्याचे पत्रकारांना सांगितले.
नार्वेकरांचे लक्ष
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे विधानभवनात बसून शिवसेनेचे कोण कोण आमदार मतदान करून गेले त्याची नोंद करीत होते. त्यावर, ‘नार्वेकर पोलिंग एजंटच राहणार’असा टोमणा काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी हाणला.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्रातून २०८ मते मिळाली होती. लाड यांना आज त्यापेक्षा एक जादाचे मत मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाड यांच्यासाठी केलेली मोर्चेबांधणी यशस्वी झाली.
भाजपाचे १२२, शिवसेनेचे ६२ असे १८४ संख्याबळ सत्ताधाºयांकडे असाताना लाड यांना २०९ मते मिळाली. म्हणजे तब्बल २५ मते अधिक मिळाली. सात अपक्ष त्यांच्यासोबत होते. इतर बहुतेक लहान पक्षांनीही त्यांना मतदान केल्याचे स्पष्ट झाले.
दोघांच्या बंडखोरीची विखेंकडून कबुली
काँग्रेसच्या दोन आमदारांनी आजच्या निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतली असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुणाचे नाव न घेता सांगितले. ते म्हणाले की, पक्षाच्या विरोधात ज्यांनी मतदान केले त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. त्यांचा रोख नितेश राणे आणि कोळंबकर यांच्याकडे होता.
कोळंबकर, नितेश राणेंची बंडखोरी
काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी भाजपाचे प्रसाद लाड यांना मत देत बंडखोरी केली. मी नारायण राणेंचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांचा पक्ष ज्यांच्यासोबत त्यांच्यासोबत मी असणार. त्यामुळे मी माझं मत कोणाला दिलं हे वेगळं सांगायला नको’, अशी प्रतिक्रिया नितेश यांनी दिली. तर काँग्रेसचे मुंबईतील राणे समर्थक आमदार कालिदास कोळंबकर हे नितेश यांच्यासोबतच मतदानाला आले होते. त्यांनीही लाड यांना मतदान केल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीची सात मते फुटली!
विखे पाटील यांनी काँग्रेसची दोनच मते फुटल्याचा दावा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ७ मते फुटल्याच्या चर्चेला बळ मिळाले.
छगन भुजबळ मतदानाला आले नाहीत अन् रमेश कदम यांनी लाड यांना मत दिल्याचे सांगितले. ही दोन मते वगळता आमच्या सर्व आमदारांनी काँग्रेसचे दिलीप माने यांना मतदान केले. गुप्त मतदान असल्याने मते कोणाची फुटली हे सांगता येणार नाही. या निवडणुकीसंदर्भात आम्ही पक्षीय पातळीवर आढावा घेऊ.
सुनील तटकरे
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी