नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले, कार्यकारिणीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 13:55 IST2023-05-17T13:55:03+5:302023-05-17T13:55:16+5:30
दामले यांना ५०, तर प्रसाद कांबळी यांना ९ मते मिळाली.

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले, कार्यकारिणीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ अभिनेते, निर्माते प्रशांत दामले यांच्या गळ्यात पडली आहे. गेल्या महिन्याभरापासून उत्सुकता लागलेल्या नाट्य परिषद कार्यकारिणीच्या निवडणुकीची प्रक्रिया यशवंत नाट्यगृहामध्ये पार पडली. दामले यांना ५०, तर प्रसाद कांबळी यांना ९ मते मिळाली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ६० सदस्यांनी १९ जणांच्या कार्यकारिणीची निवड केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर ढोलताशाच्या तालावर गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारांसह इतर रंगकर्मींनी आपला आनंद व्यक्त केला. नरेश गडेकर (प्रशासन) व भाऊसाहेब भोईर (उपक्रम) उपाध्यक्ष बनले आहेत. अजित भुरे प्रमुख कार्यवाह बनले असून, माजी सहकार्यवाह सतीश लोटके नव्या कार्यकारिणीमध्ये कोषाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
आमची लढाई आज संपली. आता नवीन नियामक मंडळ आले आहे. या नियामक मंडळात आम्ही काम करू. इतक्या लवकर नवीन नियामक मंडळाकडून कोणत्याही अपेक्षा व्यक्त करता येणार नाहीत. चांगले काम करणाऱ्यांना आमचा १०० टक्के पाठिंबा असेल. नाट्य परिषदेसमोरील उरलेल्या कामांबाबत मी आणि नवीन अध्यक्ष चर्चा करू. सर्व माझेच असल्याने भविष्यात एकत्र कामही करू.
- प्रसाद कांबळी,
नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष
मित्रमंडळींच्या आग्रहाखातर निवडणुकीला उभा राहिलो, निवडणूक लढवली आणि अध्यक्ष बनलो आहे. विजयाचा गुलाल उधळताना एक मोठी जबाबदारी आल्याचे भान आहे. यापूर्वीही नाटक आणि रंगकर्मींच्या हितासाठी काम केले. पण, आता मोठा कॅन्व्हास मिळाला आहे. तूर्तास परिषदेची कोणतीही कागदपत्रे पाहिली नसल्याने कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे हे सांगता येणार नाही. महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहांवर सोलार यंत्रणा बसवणे, नाट्य परिषदेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तळागाळातील रंगकर्मींच्या समस्या सोडवणे, नाट्य परिषदेच्या संकुलाबाबतचा निर्णय घेणे आणि सर्व रंगकर्मींना सोबत घेऊन खेळीमेळीने काम करणे हे प्रथम उद्दिष्ट आहे.
- प्रशांत दामले,
नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष
नाट्य परिषदेचे नियामक मंडळ -
अध्यक्ष : प्रशांत दामले
उपाध्यक्ष (प्रशासन) : नरेश गडेकर
उपाध्यक्ष (उपक्रम) : भाऊसाहेब भोईर
प्रमुख कार्यवाह : अजित भुरे
कोषाध्यक्ष : सतीश लोटके
सहकार्यवाह : समीर इंदुलकर,
दिलीप कोरके, सुनील ढगे
कार्यकारिणी सदस्य : विजय चौगुले, चंद्रकांत देसाई, संदीप पाटील, गिरीश महाजन, सविता मालपेकर, संजय रहाटे, दीपक रेगे, सुशांत शेलार, विशाल शिंगाडे, विजय साळुंखे, दीपा क्षीरसागर