प्रशांत किशोर यांची 'स्ट्रॅटेजी' आदित्य ठाकरेंनाही बनवणार मुख्यमंत्री ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 05:56 PM2019-07-23T17:56:03+5:302019-07-23T17:56:40+5:30
प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसाठी रणनिती आखली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना लढवत असलेल्या मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करून विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा उभी केली. तिच यंत्रणा आता प्रत्यक्षात शिवसेनेसाठी काम करत आहे.
मुंबई - २०१४ लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यानंतर राजकीय रणनितीकार म्हणून प्रशांत किशोर प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र अमित शाह यांच्या उदयानंतर किशोर यांना भाजपपासून वेगळं व्हावं लागलं. परंतु, भाजप सोडल्यानंतर प्रशांत किशोर यांचा राजकीय रणनितीकार म्हणून उदय झाला. त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघेही आपापल्या राज्याचे मुख्यमंत्री असून किशोर आता शिवसेनेचे राजकीय रणनितीकार आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. पूर्वीच्या आणि आताच्या शिवसेना पक्षात अनेक बदल दिसून येत आहेत. हा बदल प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीमुळेच झाल्याची टीका विरोधक करतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळीच पक्षाची स्ट्रॅटेजी ठरविण्यासाठी राजकीय विशेषज्ञ म्हणून प्रशांत किशोर यांना नियुक्त केले होते. त्यानुसारच आता शिवसेनेचे काम सुरू असल्याचे समजते.
प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसाठी रणनिती आखली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना लढवत असलेल्या मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करून विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा उभी केली. तिच यंत्रणा आता प्रत्यक्षात शिवसेनेसाठी काम करत आहे.
दरम्यान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी आणि युवकांशी संवाद साधला आहे. याच यात्रेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले. आदित्य यांची जन आशीर्वाद यात्रा किशोर यांच्या सांगण्यावरून असल्याचे समजते.
याआधी प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना त्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांना आणि आंध्रप्रदेशात जगमोहन रेड्डी यांना फायदेशीर ठरली. नितीश आणि जगमोहन हे दोघेही आपापल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता टिकविण्यासाठी किशोर काम करणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच किशोर यांचा करिष्मा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनविण्यासाठी फायदेशीर ठरणार का, हे येणारा काळच सांगेल.