कोर्टाच्या दणक्यानंतर प्रशांत कोरटकर दुबईला पळाला? मिटकरी म्हणाले, "दंगलीचा आधार घेऊन..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 10:59 IST2025-03-22T10:57:46+5:302025-03-22T10:59:01+5:30
छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा प्रशांत कोरटकर दुबईला पळल्याची चर्चा

कोर्टाच्या दणक्यानंतर प्रशांत कोरटकर दुबईला पळाला? मिटकरी म्हणाले, "दंगलीचा आधार घेऊन..."
Prashant Koratkar : छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि कोल्हापूरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र बऱ्याच तपासानंतरही प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. एकीकडे पोलिसांकडून शोध सुरु असताना प्रशांत कोरटकर दुबईला गेल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे. कोरटकर याचा एक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो दुबईमध्ये असल्याचे दिसत आहे. यावरुनच सत्ताधारी आणि विरोधकांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूर दंगलीचा आधार घेऊन कोरटकर दुबईला पळाला असल्याचे म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास संशोधक सावंत यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी प्रकरणी कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून प्रशांत कोरटकर फरार आहे. कोल्हापूरच्या सत्र न्यायलयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. अशातच कोरटकरचे दुबईतील फोटो व्हायरल झाल्याने तो देशाबाहेर पळून गेल्याची चर्चा सुरु झाली आहे.
दंगलीचा आधार घेऊन दुबईला पळाला - अमोल मिटकरी
"कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती समोर. पाताळात जरी गेला तरी याला शोधून आणणे सरकार समोरचे आता मोठे आव्हान ठरले आहे. नागपूर वरून थेट दुबई गाठण्याकरिता कोरटकरने दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचे एकंदरीत दिसते. गृह खात्याने त्याला तात्काळ मुसक्या आवळुन भारतात आणावे," असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
कोरटकर पोलीस संरक्षणात फरार झाला - सुषमा अंधारे
"नाकर्ते सरकार असल्यावर काय होणार? प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षण दिलं गेलं. तो पोलीस संरक्षणात फरार झाला आहे. भगतसिंह कोश्यारीपासून राहुल सोलापूरकरपर्यंत अशा घटना घडत आहेत. आपल्या महापुरुषांचं ठरवून अवमुल्यन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजंविरोधात भाजपच्या मनात कमालीचा द्वेष आहे. यातूनच कोरटकरला मोकळी दिली गेलीय," असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.