प्रशांत ठाकुरांचा अखेर राजीनामा विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा
By admin | Published: September 13, 2014 04:56 AM2014-09-13T04:56:35+5:302014-09-13T04:56:35+5:30
प्रस्तावित खारघर टोलनाक्यावर स्थानिकांना सवलत देण्याबाबत निर्णय झाला नसल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी अखेर शुक्रवारी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा दिला
पनवेल : प्रस्तावित खारघर टोलनाक्यावर स्थानिकांना सवलत देण्याबाबत निर्णय झाला नसल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी अखेर शुक्रवारी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा दिला. आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही आणि काँग्रेस पक्षातच राहून काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल ब्रिगेडचे सदस्य आणि युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे ठाकूर यांनी प्रस्तावित खारघर टोलनाक्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने खारघर येथे टोलनाका उभारला. पनवेल आणि सिडकोवासीयांना दिवसातून अनेकदा या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे त्यांना टोल आकारला जाऊ नये, अशी मागणी काही महिन्यांपासून आमदार ठाकूर यांनी लावून धरली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली. या समितीने अहवालही सादर केला. मात्र त्यावर निर्णय झाला नाही. आचारसंहितेआधी याबाबत निर्णय घ्या, असा आग्रह त्यांनी लावून धरला. मात्र कोणत्याही हालचाली होत नसल्याने ठाकूर यांनी शुक्रवारी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राजीनामा दिला.