प्रशांत वासनकरचा कोट्यवधींचा घोटाळा

By admin | Published: July 29, 2014 12:46 AM2014-07-29T00:46:47+5:302014-07-29T00:46:47+5:30

वासनकर समूह ठेवीची रक्कम अडीचपट आणि तिप्पट करण्याच्या गोरखधंद्यात लिप्त असल्याचे चौकशीत आढळून आल्यानंतर पोलिसांनी प्रशांत वासनकर, त्याचा भाऊ विनय वासनकर आणि मेव्हणा

Prashant Vasankar's Bill Scam | प्रशांत वासनकरचा कोट्यवधींचा घोटाळा

प्रशांत वासनकरचा कोट्यवधींचा घोटाळा

Next

आठ फसव्या योजना : हजारो लोकांची फसवणूक
नागपूर : वासनकर समूह ठेवीची रक्कम अडीचपट आणि तिप्पट करण्याच्या गोरखधंद्यात लिप्त असल्याचे चौकशीत आढळून आल्यानंतर पोलिसांनी प्रशांत वासनकर, त्याचा भाऊ विनय वासनकर आणि मेव्हणा अभिजित चौधरी या तिघांना अटक केली. पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार आहे. वासनकरच्या गोरखधंद्यात जवळपास हजारो लोकांच्या कोट्यवधींच्या ठेवी अडकल्या आहेत.
अडीचपट आणि तिप्पट परतावा
वासनकर समूहाच्या एकूण आठ प्रकारच्या ठेव योजना होत्या. यापैकी ‘पर्क’ नावाच्या योजनेत अडीच वर्षांत मूळ ठेवीच्या अडीचपट रक्कम आणि दुसऱ्या ‘टी-४८’ योजनेत ठेवीची रक्कम चार वर्षांत तिप्पट होणार होती. याशिवाय वार्षिक, सहामाही, तिमाही परताव्याच्या ठेव योजनाही होत्या. आयएसई सिक्युरिटीच्या सब-ब्रोकरच्या गोंडस पडद्याआड गोलमाल ठेव योजनांद्वारे वासनकर समूहाने जनतेला फसविले.
दरसाल ६० टक्के व्याजाचे आमिष
वासनकर समूहाच्या ‘पर्क’ योजनेत व्याजाचा दर प्रति महिना ५ टक्के तर वर्षाला ६० टक्के तर ‘टी-४८’ योजनेत व्याजाचा दर महिन्याला ४.१६ टक्के तर वर्षाला ५० टक्के होता. याशिवाय वार्षिक, सहामाही, मासिक योजनांमध्ये हा समूह २५ ते ३२.५० टक्के व्याज देत होता. जगातील कुठलीही व्यापारी संस्था एवढे अवाढव्य व्याज देऊन नफा कमावू शकत नाही, याची कल्पना समूहाला असतानाही कोट्यवधींच्या ठेवी स्वीकारल्या.
समूहाच्या दोन कंपन्या
वासनकर समूहाच्या दोन कंपन्या आहेत. वासनकर इन्व्हेस्टमेंटस् आणि वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड. यापैकी वासनकर इन्व्हेस्टमेंटस् कंपनी ही प्रशांत वासनकरने २२-२३ वर्षांपूर्वी शेअर दलालीचे लायसन्स मिळविण्यासाठी स्थापन केली होती; नंतर हे लायसन्स वासनकर वेल्थ मॅनेजमेंटकडे ट्रान्सफर केले होते. त्यामुळे ‘रिकामा खोका’ म्हणून शिल्लक राहिलेली वासनकर इन्व्हेस्टमेंटस् ही कंपनी वासनकर समूह ठेवी अडीचपट-तिप्पट करण्यासाठी वापरत होती. वासनकर समूह हा वासनकर इन्व्हेस्टमेंटस्मध्ये ठेवी स्वीकारीत होता. पावतीऐवजी ‘सर्टिफिकेट आॅफ इन्व्हेस्टमेंट’ ठेवीदाराला देत होता. हे स्वयंघोषित सर्टिफिकेट म्हणजे कॉम्प्युटरवर काढलेले प्रिंट आऊट होते. त्यात केवळ ठेवीची रक्कम, परताव्याची रक्कम आणि तारीख एवढेच नमूद केलेले असायचे. त्यावर ठेवी स्वीकारणाऱ्या कंपनीचे नाव नव्हते. वासनकर इन्व्हेस्टमेंटस्चा ‘रिसिव्हड’चा रबर स्टॅम्प मारून एक कोंबडा मारलेला असायचा.
बदमाशी बचत खात्याच्या चेकची
वासनकर समूह जरी वासनकर इन्व्हेस्टमेंटस् या कंपनीसाठी ठेवी स्वीकारत असला तरी, परताव्याचे पुढच्या तारखेचे चेक मात्र प्रशांत वासनकर स्वत:च्या इंडियन ओव्हरसीज बँकेच्या बचत खात्यातून देत होता. कायद्याचा विचार केला तर वासनकर समूहाने सर्टिफिकेट आॅफ इन्व्हेस्टमेंट आणि बचत खात्याचे चेक हे प्रकार फसवणुकीच्या हेतूने जाणूनबुजून केल्याचे दिसते.
ठेवी स्वीकारल्याची वासनकरांची कबुली
उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारे अडीचपट आणि तिप्पट परतावा देणाऱ्या ठेवी स्वीकारल्याची कबुली वासनकरने काही महिन्यांआधी लोकमत कार्यालयात दिली होती. अशाप्रकारच्या पावत्या सर्व शेअर दलाल देतात. मुख्य दलाल आयएसई सिक्युरिटीजने पैसे घेण्याचा अधिकार आपल्याला दिला नाही. त्यामुळे आपण वासनकर इन्व्हेस्टमेंटस्च्या पावत्या देतो, असा अजब खुलासा वासनकरने त्यावेळी केला होता. ठेवी स्वीकारणे माझा नियमित व्यवसाय नाही. काही मूठभर लोकांकडून अशा ठेवी स्वीकारल्या आहेत, अशी कबुली त्याने दिली होती. पण त्याचे वक्तव्य खोटे असल्याचे चौकशीत आढळून आले आहे.
नियमांची पायमल्ली
वासनकरने गोरखधंद्यातून कंपनीज् अ‍ॅक्ट, इन्कमटॅक्स अ‍ॅक्ट, अ‍ॅक्सेपटन्स आॅफ डिपॉझिट रुल्स याशिवाय महाराष्ट्र स्टॅम्प ड्युटी अ‍ॅक्ट आणि सेबी व रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया यांच्या नियमांची बेधडक पायमल्ली केल्याचे आढळून आले आहे. अशा गोलमाल गुंतवणूक योजनांपासून जनतेला वाचविण्यासाठी नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वासनकर समूहाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशीची मागणी ‘लोकमत’ने काही महिन्यांआधी केली होती.
वासनकर समूहाची ‘सेबी’तर्फे चौकशी
सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्सचेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) वासनकर समूहाच्या संशयास्पद गुंतवणूक योजना व इतर अनधिकृत व्यवहाराची चौकशी केली आहे. वासनकर समूहाच्या गुंतवणूक घोटाळ्याची एक वृतमालिका प्रकाशित केली होती़ त्याची दखल घेऊन एका जागरूक वाचकाने ‘लोकमत’च्या बातम्याच्या कात्रणासहित सेबीकडे वासनकर समूहाविरुद्ध चौकशीची मागणी केली होती. तक्रारीमध्ये वासनकर समूहाने दोन हजार लोकांकडून अंदाजे १५०० कोटी रुपयांच्या ठेवी घेतल्या असून, त्या सर्व धोक्यात आल्याने गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी ‘सेबी’ने ताबडतोब चौकशी करावी, अशी मागणी गुंतवणूकदाराने केली होती़ (प्रतिनिधी)
अशी होती गुंतवणुकीची योजना
कंपनीच्या सदस्यांसाठी दाम दुप्पट योजना ३३ महिन्यांची आणि सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी ४८ महिन्यांची होती. यासाठी किमान गुंतवणुकीची रक्कम ५० हजार रुपये ठेवण्यात आली होती. दाम तिप्पट योजना केवळ कंपनीच्या सदस्यांसाठी होती आणि ती ४८ महिन्यांची होती. किमान गुंतवणूक पाच लाख रुपये ठेवण्यात आली होती. २५ ते ३२.५ टक्क्यांपर्यंतची वार्षिक परतावा योजना ४८ महिन्यांची होतो आणि तीही फक्त कंपनी सदस्यांसाठी होती. यासाठी किमान गुंतवणूक पाच लाख रुपये ठेवण्यात आली होती. वार्षिक ४० टक्के परताव्याची योजना कंपनी सदस्यांसाठी १८ महिने आणि सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी २४ महिन्यांची होती. यासाठी किमान गुंतवणूक ५० हजार रुपये ठेवण्यात आली होती. २५ टक्के वार्षिक परताव्याची योजना कंपनी सदस्यांसाठी आणि १८ टक्के वार्षिक परताव्याची योजना सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी होती. त्यासाठी किमान गुंतवणुकीची रक्कम ५० हजार रुपये ठेवण्यात आली होती. तिमाही ५.२५ टक्के परताव्याची योजना कंपनीच्या सदस्यांसाठी होती. तर ३.७५ टक्के परताव्याची योजना सर्वसाधारण सदस्यांसाठी होती. यासाठी एक लाख रुपये किमान गुंतवणूक ठेवण्यात आली होती. दोन वर्षांसाठी ५.२५ टक्के तिमाही परताव्याची योजना कंपनी सदस्यांसाठी होती आणि ३.७५ टक्के परताव्याची योजना सर्वसाधारण सदस्यांसाठी होती. यासाठीही एक लाख रुपये किमान गुंतवणूक ठेवण्यात आली होती. मासिक १.६० टक्के परताव्याची योजना केवळ कंपनी सदस्यांसाठी होती आणि पाच लाख रुपये किमान गुंतवणूक ठेवण्यात आली होती.

Web Title: Prashant Vasankar's Bill Scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.